मुंबई: चीनकडून सुरू असलेल्या कुरघोडीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानप्रमाणे चीनचेही वाकडे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याचे शौर्य आता गाजवायला हवे. आजार बळावला आहे. तो टोकास जाण्याआधीच पंतप्रधानांनी शस्त्रक्रिया करावी. कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या! कारगिल विजय दिवसाचा हाच संदेश आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक वगैरे करूनही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे लॉजिक मांडले की, ‘ दुष्ट आहे. दुष्टांचा स्वभाव काही केल्या आपण बदलवू शकत नाही. भारताने पाकिस्तानबरोबर नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला. मात्र पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रयत्न केला.’ पंतप्रधान मोदी यांनी सत्य तेच सांगितले. पण हेच ‘मैत्रीचा हात’ प्रकरण चीनच्या बाबतीतही लागू पडते. दुष्टपणा त्यांच्या वाकड्या नजरेतही स्पष्ट दिसतो. त्यामुळे ते वाकडे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याचे शौर्य आता गाजवायला हवे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने हा निशाना साधला आहे.

शिवसेनेचं टीकास्त्र…

>> पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये सांगितले की, ‘पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला.’ पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला हे खरेच. पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याच खंजिराने तेव्हा पाकिस्तानचा कोथळा काढला होता. म्हणून हा कारगिल विजय दिवस आपण साजरा करतो.

>> आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल दिला. संरक्षणमंत्री यांचे भाषण टोकदार तितकेच मनगटे पेटवणारे आहे. पण सध्या आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने कोण पाहत आहे? वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आपण सडेतोड उत्तर नक्की कधी देणार आहोत? पंतप्रधान मोदी यांनी तर त्यांच्या ‘मन की बात’मध्ये चीनचे नावही घेतले नाही. देशाची जनता मनकवडी आहे. त्यामुळे लोकांनीच काय ते समजून घ्यावे, असे पंतप्रधानांनी ठरवून टाकले आहे.

>> पाकिस्तानचे संकट संपलेले नाही. आता गलवान खोऱ्यात १४ हजार फुटांवर घुसतोय व तेथे तणावाची स्थिती आहे. आपले २० जवान शहीद झाले. त्यांच्या हौतात्म्याचा बदला आपण घेतला नाही. पेंगाँग, डेपाचंग भागातून चिनी सैन्य अजूनही हटलेले नाही. पण त्याबाबत चर्चा मात्र सुरू आहे. चिनी सैन्य आधी भारताच्या हद्दीत घुसले. दहा किलोमीटर घुसल्यावर चर्चा करून दोन किलोमीटर मागे गेले. म्हणजे आठ किलोमीटरची जमीन त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवली आहे. पण आपलीच दोन किलोमीटर जमीन सोडल्याचा राजकीय आनंदोत्सव साजरा होतोय. चीन हिंदुस्थानच्या हद्दीत घुसला आहे व मागे हटायचे नाव घेत नाही. म्हणजे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याचाच हा प्रकार आहे. चिन्यांचे डोळे माकडांप्रमाणे लहान आहेत. त्यामुळे चिनी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत हे कुणाला दिसत नसेल तर प्रश्नच संपला.

>> प्रश्न इतकाच आहे की, पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यास २१ वर्षे होऊन गेली. पाकिस्तानचा तो स्वभाव आहे. इतिहासात अफझल खानाने छत्रपती शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करताच छत्रपतींनी अफझल खानाचा कोथळाच काढला व त्याचे थडगे प्रतापगडाच्या पायथ्याशी सरकारी इतमामात बांधले. तसे काही चीनच्या बाबतीत घडल्याचे दिसले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here