बुलढाणा : एकीकडे विधानपरिषद निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलं असतानाच बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मोताळा नगरपंचायतीतील काँग्रेसच्या आठ दिग्गज नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोताळामध्ये झालेल्या या प्रवेशाचा विधानपरिषद निवडणूक मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसला खिंडार पाडत नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून अभिनंदन केलं. तसंच या नगरसेवकांच्या वॉर्डातील विकासकामांसाठी नगरविकास खात्याच्या मार्फत निधी देण्याचंही आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान; नाशिकमध्ये शेवटच्या क्षणी बाजी पलटणार? उमेदवारांची धाकधूक वाढली

दरम्यान, आज सकाळी ८ वाजता अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून भाजपचे डॉ. रणजीत पाटील व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यामध्ये या मतदारसंघात लढत होत आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार १७२ पदवीधर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २ फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान होत आहे. ही निवडणूक भाजपचे डॉ. रणजित पाटील, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकर यांच्यासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सध्या तिहेरी लढतीचे चित्र असले तरी अपक्ष आणि बंडखोरांकडे लक्ष लागून आहे. मुळात डॉ. पाटील यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण विभाग पिंजून काढला. महाविकास आघाडीकडून लिंगाडे यांच्यासाठी जोर लावला जात आहे. त्यांनी स्वत:ही १२ दिवसांत पाचशेवर गावांना भेटी दिल्याचा दावा केला आहे. जुनी पेन्शन योजना ही निवडणूक प्रचारातील महत्त्वाची बाब राहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here