पारस कुमार एका कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील लष्करातून निवृत्त झाले आहे. पारसचा विवाह गुरुवारी गाझियाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या वैशालीशी झाली. शुक्रवारी वैशालीला कुटुंबीयांनी निरोप दिला. ती सासरी पोहोचली. शनिवारी घरी भजनाचा कार्यक्रम होता. सकाळी १० वाजता वैशाली आंघोळीसाठी गेली. मात्र बराच वेळ होऊनही ती बाहेर आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.
घरातील महिला पुजेसाठी वैशालीची वाट पाहत होत्या. मात्र ती बाथरुममधून बाहेर येत नव्हती. वारंवार हाका मारूनही वैशाली प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे अखेर कुटुंबीयांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. आत एका कोपऱ्यात वैशाली सरळ बसलेली दिसली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
वैशाली आणि पारस फुलांनी सजवलेल्या कारमधून गाझियाबादवरून मेरठला आले. त्याच कारमधून वैशालीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. याबद्दल गाझियाबादमधील वैशालीच्या कुटुंबीयांना समजताच त्यांना जबर धक्का बसला. एक दिवस आधी सासरी गेलेल्या वैशालीच्या निधनाबद्दल समजताच सगळेच हादरले. सगळे लगेचच मेरठला पोहोचले. बाथरूममधील असलेल्या गिझरमधून झालेल्या गळतीमुळे वैशालीचा मृत्यू झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आल्याचं तिच्या भावानं सांगितलं.