अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक निर्णय म्हणून काल रात्री पाठिंबा दिला खरा पण आता तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली आहे. ‘तांबे यांचा विजय निश्चित असून त्यांनी आता भाजपमध्ये यावे. त्यासाठी आम्ही अग्रही आहोत,’ असे विखे पाटील मतदानानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

डॉ. सुधीर तांबे आणि उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या भूमिकेमुळे या मतदारसंघातील निवडणूक पहिल्या दिवसापासून गाजत आहे. सुरुवातीला भाजपची उमेदवारी तांबे यांना असेल असे वाटत होते, त्यानंतर भाजपने उमेदवारच न दिल्याने ते तांबे यांना पाठिंबा देती, असं बोललं जात होतं. मात्र, भाजप नेतृत्वाने शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर पाठिंबा दिलाच नव्हता. अखेर प्रचार संपल्याच्या रात्री स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगत विखे यांच्या कार्यकर्त्यांना तांबे यांचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार कार्यकर्ते लगेच सक्रीय झाले.

आज विखे पाटील यांनी मतदान केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘तांबे यांच्या मामांची (म्हणजेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात) यांची वैयक्तिक काय भूमिका आहे, हे मला माहिती नाही. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षालाच मामा बनविले असल्याचे दिसून येते. सत्यजीत तरुण आहे. त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे. तो नक्की निवडून येईल. आता त्याने भाजपमध्ये यावे. यासाठी आम्ही अग्रही आहोत’, असे विखे पाटील म्हणाले.

रवी राणांमुळे मोक्याची क्षणी भाजप उमेदवार अडचणीत; रणजीत पाटलांवर गुन्हा दाखल

दरम्यान, आज नगर जिल्ह्यातील मतदान केंद्रावरही भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसून येते. सर्व ठिकाणच्या बुथवर पक्षाचे कार्यकर्ते थांबले आहेत. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. नगर जिल्ह्यात चुरशीने मतदान होताना दिसत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नगर जिल्ह्याने मतदानात आघाडी घेतली.

महविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही कंबर कसली आहे. शुभांगी पाटील यांच्यासाठी त्यांनीही केंद्रावर बूथ लावले आहेत. तेथेही शिवसेनेसह इतर घटक पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. पोलीस आणि प्रशासनाने मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्था केली असल्याने दुपारपर्यंत प्रक्रिया सुरळीत सुरू होती.

दरम्यान, भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही ठिकठिकाणी मतदान केंद्राला भेटी दिल्या. माजी आमदार शिवाजी कर्डिले, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्यासह पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासंबंधी आम्हाला पक्षाने आदेश दिलेला नाही. कार्यकर्त्यांच्या भावना आणि उमेदवार पाहून आम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here