पुणे: भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनांनंतर पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून महाविकास आघाडीतील तर सर्वच पक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यातच आता आज झालेल्या ‘मिसळ पार्टी’ने महाविकास आघाडीचे टेन्शन आणखीच वाढवले असून कसब्याच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीत नक्की कोण लढणार ? हा प्रश्नच आहे. कारण सर्वात आधी राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी आपण लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होते. तर, आघाडीत लढताना पारंपरिक मतदार संघ काँग्रेसचा असल्याने ते ही जागा सोडण्यास तयार नाहीत. यातच आता शिवसेनेनेदेखील आपण ही निवडणूक लढवणारच असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे महाविकास आघाडीत कसब्याच्या जागेवरून बिघाडी होण्याचे चिन्ह आहेत.

अशातच आता कसबा पेठमधून काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब दाभेकर इच्छूक आहेत. त्यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांसह समर्थक आणि कार्यकर्त्यांना मिसळ पाव व उसळ पावची मेजवानी दिलीय. यामुळे कसबा पेठ निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचीही शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्यामुळेच या मिसळ पार्टीचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मविआमध्ये ठिणगी, कसब्यात ठाकरेंच्या मावळ्याने शड्डू ठोकला, काँग्रेस काय करणार?
या पार्टीला महाविकास आघाडीचे शहरातील प्रमुख नेते उपस्थित होते. या पार्टीनंतर दाभेकर यांनी महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा आपल्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचं जाहीर करून टाकलंय. ‘ महाविकास आघाडीतील अनेक नेते मला भेटले. त्यानंतर आमची बैठक झाली. त्या बैठकीत ठरलं की मी उमेदवार असेल तर पूर्ण पाठिंबा देऊन मदत करू. इतकंच नाही तर शिवसेनेच्या बैठकीत देखील माझ्या नावाची चर्चा झाली असून मी उमेदवार असलो तर पूर्ण पाठिंबा देऊ असं ठरलं’ असल्याचा दावा दाभेकर यांनी केलाय. मी काँग्रेसचा १९७६ पासून सभासद आहे. जुना कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसकडे अपेक्षा व्यक्त केलीय. आघाडीत सर्व पक्षांचे नेते माझ्या मागे आहेत. ते मला मदत करणार आहेत. असं दाभेकर म्हणाले आहेत.
मतं कमी पडली तर तिकीट गेलंच म्हणून समजा, संजय काकडेंनी नगरसेवकांना झापलं

कोण आहेत बाळासाहेब दाभेकर ?

बाळासाहेब दाभेकर हे १९७६ पासून काँग्रेस सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यावेळीही ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांच्या रांगेत आहेत. बाळासाहेब दाभेकर यांचा मुलगा निरंजन दाभेकर हा युवासेनेचा पदाधिकारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here