जालना: पोलीस भरतीसाठी पुण्याला गेलेल्या जालन्याच्या तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू झाला आहे. जालन्यतील जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील २१ वर्षीय तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला. सूरज रवींद्र शेजुळ असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी तो तीन दिवसांपूर्वी पुण्याला गेला होता. तिथे त्याने मैदानी चाचणी परीक्षाही दिली होती. त्यात तो तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे समजते.

मैदानी चाचणीतील यशाच्या आनंदात सूरज पुणे येथील नातेवाइकांकडे रविवारी मुक्कामी थांबला होता. रविवारी सकाळी आपल्या नातेवाईक आत्येभावासह कपडे खरेदीसाठी गेला असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका कारने जोरदार धडक दिली. सूरज रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र रविवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या सोबत असलेला त्याचा आत्येभाऊ अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
लेकीच्या लग्नाला यायचं हं! पत्रिका वाटायला निघाले बाबा, सोबत लेकालाही घेतलं; पण भलतंच घडलं
अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या सूरजला पोलीस व्हायचे होते. त्यासाठी पदवीचे शिक्षण सुरू असताना तो प्रत्येक ठिकाणी पोलीस भरतीसाठी जायचा. यावेळी पोलीस होऊनच येईन, असे मनाशी ठरवून पुण्याला गेलेला सूरज यशाचे शिखर गाठूनही नियतीच्या खेळात हरला. नियतीने खेळलेल्या या खेळात त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. काल सोमवारी रात्री उशिरा सूरजवर काळेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आईवडील व नातेवाइकांचा आक्रोश ऐकून गावकऱ्यांच्या पापण्या ओलावल्या. मनमिळाऊ स्वभावाच्या सूरजच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here