पुणे : कसबा पोट निवडणुकीसाठी एकीकडे भाजपचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील ही जागा नक्की कोणी लढायची याचा गोंधळ देखील कमी होत नाही. काँग्रेसने आघाडीत हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याचं सांगितल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत हा मतदारसंघ काँग्रेसचा कधीच नव्हता अशी भूमिका घेतली असून कसब्यात राष्ट्रवादी काँग्रेसची लढण्याची तयारी दर्शविली आहे.

पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावी, असा एक ठराव मंगळवारी (३१ जानेवारी) झालेल्या पक्षाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख ५ इच्छुकांची नावेही पक्षकडून प्रदेशकडे पाठविण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कसब्याची जागा कधी काँग्रेसची नसल्याचा दावा केला आहे. १९९९ पासूनच आम्ही आघाडीत आहोत. वास्तविक पाहता ही जागा राष्ट्रवादीची होती. २००९ साली सुशीलकुमार शिंदे यांनी ही जागा रोहित टिळक यांच्यासाठी मागून घेतली होती. पवार साहेबांनी सुद्धा त्यांचा सन्मान ठेवला होता. त्याच्यामुळे ही जागा काँग्रेसची कधीच नव्हती ही जागा राष्ट्रवादीची होती, असा दावा जगताप यांनी केला आहे. तर २०१४ चा तसेच २०१९ चा निकाल पाहता आणि राष्ट्रवादीचा अनुभव पाहता राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे आणि यंत्रणा देखील राष्ट्रवादीच राबवू शकते असं देखील प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

अजित पवारांचा कट्टर समर्थक एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला? अण्णा बनसोडेंचा मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून प्रवास
कसब्यात १९९९, २००४ आणि २०१४ ला राष्ट्रवादीने निवडणुका लढवल्या होत्या आणि निर्णायक मते देखील मिळवली होती. त्यामुळे ही निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यां आग्रह आहे. काँग्रेसची यंत्रणा पाहता राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच यंत्रणा काँग्रेसचे काम करत आली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे ,रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर, रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक असून ही नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले जाणार आहेत. हि जागा महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे की इतर पक्षांना द्यायची आहे की राष्ट्रवादीकडून लढवायची आहे हा निर्णय नेते घेतील आणि त्यांचा आदेश जो असेल तो आम्ही मान्य करणार आहोत असं देखील जगताप म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here