बीड: जिल्ह्यातील केज तालुक्याच्या शिरूर घाट येथील दीपक सांगळे याच्यासह त्याचे सात मित्र नेपाळमध्ये फिरायला गेले असता त्यांची लूटमार झाल्याची घटना घडली आहे. लूटमारीनंतर सदर तरुणांकडील पैसे संपल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र सांगळे आणि त्याच्या मित्रांनी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधत आपलं गाऱ्हाणं मांडलं आणि त्यानंतर या अडकलेल्या तरुणांना दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर घाट येथील दीपक जीवन सांगळे याच्यासह महेश हरकर, विश्वजीत घुले, किरण चव्हाण, आकाश खामकर, अक्षय पारेकर, अविष्कार मुळीक व सुरज लोंढे हे आठ तरुण फिरायला नेपाळमध्ये गेले होते. दरम्यान सोमवारी रात्री काठमांडू शहरातील तामिल परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील सर्व पैसे तसेच त्यांच्या अकाऊंटवरील पैसेही जबरदस्तीने घेतले व त्यांना मारहाण करून सोडून दिले.

मुंबईत माफक दरात कॅन्सरच्या चाचण्या उपलब्ध; बॉम्बे रुग्णालयात मिळणार सुविधा

घाबरलेले आठही तरुणांनी रडत-रडत जवळच्या पोलीस ठाणे गाठले, मात्र तिथेही त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. तेव्हा त्यांनी माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना पोलीस ठाण्यातील वायफाय वापरून व्हॉट्सअॅप कॉल केला व मदतीची याचना केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी संबंधित तरुणांना धीर दिला तसेच तात्काळ मदतीचे आश्वासन दिले. अपघातानंतर सध्या बेड रेस्ट घेत असलेल्या धनंजय मुंडे यांनी एक ट्वीट करत परराष्ट्र मंत्री, नेपाळमधील भारतीय दूतावास, नेपाळ पोलीस, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना याबाबत माहिती दिली. तसेच फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयासही सदर तरुणांना मदत करण्याबाबत विनंती केली.

बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याबाबत माहिती देत मुलांच्या सुटकेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही क्षणांतच यंत्रणा कामाला लागल्या. नेपाळमधील भारतीय दूतावास व गृह विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट संबंधित पोलीस ठाणे गाठून तरुणांशी संपर्क साधला व त्या तरुणांच्या जीवात जीव आला.

दरम्यान, त्या तरुणांची लूट करणाऱ्या दोन चोरट्यांना देखील नेपाळ पोलिसांनी अटक केली असून, सर्व तरुण सध्या सुखरूप आहेत व भारतीय शासकीय यंत्रणेमार्फत त्यांची तामिल (काठमांडू) येथील अग्रवाल भवन येथे राहणे व अन्य व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here