fire news today, देवाची पूजा ठरली अखेरची! एका ठिणगीने इमारतीत भडका; ११ महिलांसह १५ जणांचा होरपळून मृत्यू – fire news today in dhanbad ashirwad tower in jharkhand 15 people life ends
धनबाद : देशात वारंवार अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता आणखी एक अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. या भीषण आगीमध्ये १५ लोकांचा होरपळून मृत्यू झाला तर यामध्ये ११ महिला, ३ मुलं आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील धनबाद इथल्या आशीर्वाद टॉवरला भीषण आग लागली होती. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच सर्वत्र गोंधळ उडाला होता. काही क्षणातच आगीने मोठा पेट घेतला. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान, आशीर्वाद टॉवरमध्ये अनेक नागरिक फसले होते. त्यामुळे १५ जणांनी आपला जीव गमावला.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून यावर स्वत: संपूर्ण घटनेत लक्ष घालतील अशी माहिती त्यांनी दिली. या टॉवरमधील लोकांचा होरपळून मृत्यू झाला हे अतिशय हृदयद्रावक आहे. तर घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
पूजेच्या वेळी ठिणगीने घेतला पेट
इमारतीमध्ये पूजा सुरू होती. यावेळी ठिणगी उडाली आणि आगीने पेट घेतला. यामध्ये आतापर्यंत १५ लोकांचे मृतदेह हाती लागले असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.