कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर आज सकाळी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर छापा टाकला आहे. गेल्या काही तासांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू असून सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ सध्या मुंबईमध्ये असल्याचे समजते.
दरम्यान आज बुधवारी सकाळी ११ वाजता ईडी अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या शाहुपुरी मुख्य कार्यालयात छापा टाकत तपासणी सुरू केली आहे. यावेळी जिल्हा बँकेत मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले आहेत.