चालक सोमवारी सकाळी चिराग यांनी मुंबईला घेऊन जाण्यासाठी आला. त्यांनी खोलीचं दार ठोठावलं. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. मोबाईलवर कॉल केला. मात्र चिराग फोन घेत नव्हते. याची माहिती चालकानं रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांना दिली. तिथून पोलिसांना संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चिराग खोलीत मृतावस्थेत आढळले.
चिराग यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी कुटुंबीयांची माफी मागितली होती. मुलांचा नीट सांभाळ कर, असा संदेश त्यांनी पत्नीसाठी लिहिला होता. चिराग यांच्या मृत्यूबद्दल समजताच त्यांच्या कुटुंबानं तातडीनं इगतपुरीला धाव घेतली.
गेल्या महिन्यात भांडूप पोलीस ठाण्यात चिराग यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती इगतपुरी पोलिसांच्या तपासातून समोर आली. भांडूप पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिला. चिराग यांना तीन आठवड्यांपूर्वी चौकशीला बोलावण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. मात्र या तक्रारीबद्दल अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
चिराग यांची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात येईल, अशी माहिती इगतपुरी पोलीस दलातील अधिकाऱ्यानं दिली. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी एफआयआर नोंदवलेला नाही. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.