मुंबईः भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानामध्ये () पट्टेधारी तरसाची जोडी दाखल झाली आहे. ही तरसाची जोडी कर्नाटकातील म्हैसूरच्या श्री चमाराजेंद्र प्राणीशास्त्र उद्यानाकडून राणीच्या बागेला देणगी म्हणून देण्यात आली आहे.

२ जानेवारी २०२० रोजी तरसाची जोडी प्राणिसंग्रहालयात दाखल झाली आहे. पट्टेधारी तरसाच्या जोडीतील नर ३ वर्षांच्या असून, त्याचे नाव वरुण आहे. तर मादी २ वर्षांची असून, तिचे नामकरण सौम्या असे करण्यात आले आहे. घनदाट जंगलात राहतात आणि ते वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनुसूची तीनमध्ये समाविष्ट आहेत. एकटे राहणारे आणि निशाचर म्हणून ओळखले जातात. तरसांचे प्राणिसंग्रहालयातील आयुर्मान २५-२५ वर्षांचे असते. लहान मुलांच्या कथेत आणि लोककथांमध्ये तरसाला दुष्ट आणि वाईट म्हणून हिणवले गेले असले, तरी अन्न साखळीतील त्यांची भूमिका सर्वांत उपयुक्त प्रजातींपैकी एक आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथून आणलेली ही पट्टेदार तरसांची जोडी सद्यस्थितीत प्राणिसंग्रहालयाच्या कॉरंटाइन सुविधेमध्ये असून, लवकरच ती नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केली जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

अन्य प्राणिसंग्रहालयातील अथवा परदेशातून कोणताही वन्यप्राणी आणण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. संबंधित प्राणिसंग्रहालयातून वन्यप्राणी मिळविण्यासाठी त्यांना त्यांच्या मागणीनुसार अन्य वन्यप्राणी द्यावे लागतात. या आदानप्रदान प्रक्रियेला सहमती मिळाल्यानंतरच राणी बागेत वन्यप्राणी आणणे शक्य होते, असे प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, म्हैसूर प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी भेट म्हणून राणीच्या बागेला दिले असल्याने त्या बदल्यात कोणतेही प्राणी त्या संग्रहालयाला द्यावे लागणार नाहीत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील पर्यटनस्थळांपैकी प्रसिद्ध असलेल्या राणी बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला असून, या प्रकल्पाअंतर्गत देश-विदेशातील वन्यप्राणी प्राणिसंग्रहालयात आणण्यात येणार आहेत. मंगळुरू प्राणिसंग्रहालयातील बिबळ्या, कोल्हा, मोराची जोडी तसेच सूरत प्राणिसंग्रहालयामधील अस्वल आदी प्राणी राणी बागेत दाखल झाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here