कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रातील आठ आमदार मंत्रिपदाचे दावेदार आहेत. यातील तिघांचा समावेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये कोल्हापूरला दोन तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकास ही जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत आहेत. पद न मिळाल्यास काहींची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचे गाजर दाखवण्यात येणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रातून सध्या सांगलीचे सुरेश खाडे आणि सातारा जिल्ह्यातून शंभूराज देसाई हे दोघेच मंत्रिमंडळात आहेत. कोल्हापूरची पाटी कोरी आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असले तरी त्यांचा समावेश हा पुण्याच्या कोट्यातून झाला आहे. कोकणच्या दीपक केसरकर यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी तूर्त देण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूरला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देताना पालकमंत्रिपदही बदलण्यात येणार असल्याचे समजते.

भावाला सोडलं, घरी किराणा दिला अन् नंतर थेट तरुणाचा मृतदेह आढळला; मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

येत्या महिनाभरात राज्यातील मंत्र्यांची संख्या वाढणार आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील आठ आमदार या पदासाठी इच्छुक आहेत. यातील केवळ दोन अथवा तीन आमदारांनाच ती संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजप, जनसुराज्य आणि शिंदे गटाचे आमदार या भागात आहेत. सध्या तरी आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर यांचा मंत्रिपदावर डोळा आहे. यातील कोरे आणि बाबर यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. उर्वरित आमदारांमध्ये कुणाला हे पद मिळणार याची उत्सुकता आहे
.
शिंदे गटात दावेदार जास्त आणि कोटा कमी अशी परिस्थिती आहे. यामुळे विस्तारानंतर नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी कॅबिनेट दर्जाचे महामंडळ एक-दोन आमदारांना देण्याचे नियोजन सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश होताना मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी मंत्रिपदाचा खुराक कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.

हे आहेत मंत्रिपदाचे दावेदार

१. राजेंद्र पाटील यड्रावकर
२. प्रकाश आबिटकर
३. विनय कोरे
४. प्रकाश आवाडे
५. शिवेंद्रराजे भोसले
६. अनिल बाबर
७. सुधीर गाडगीळ
८. गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here