मालगोदाम रोडवर असलेल्या बलिया आर्म्स कॉर्पोरेशनचे मालक नंदलाल गुप्ता बुधवारी दुपारी फेसबुकवर लाईव्ह आले. काही जणांकडून मी कर्ज घेतलं होतं. त्यांचे पैसे व्याजासकट परत केले. मात्र तरीही ते त्रास देत असल्याची व्यथा गुप्ता यांनी लाईव्ह मांडली. मला आता जगायचं नाही. माननीय योगीजी, मोदीजी आमच्या कुटुंबाला न्याय द्या, माझ्या कुटुंबाचं भलं करा, असं गुप्ता लाईव्हदरम्यान म्हणाले.
फेसबुक लाईव्हवर व्यथा मांडल्यानंतर गुप्ता यांनी कानशिलाजवळ पिस्तुल ठेवलं आणि गोळी झाडली. हा प्रकार लाईव्ह पाहून अनेकांना धक्का बसला. दुकानात काम करणारा मोनू त्याच्या घरातून निघाला. त्यानं धावतपळत दुकान गाठलं. तो मालकांना शोधू लागला. मात्र गुप्ता यांनी दुकान आतून बंद केलं होतं. त्यानं शेजारच्या दुकानातून आत डोकावून पाहिलं. तेव्हा त्याला गुप्ता यांचा मृतदेह खुर्चीवर रक्तबंबाळ स्थितीत दिसला.
गुप्ता यांना मृतावस्थेत पाहून मोनू किंचाळला. दुकानाच्या वर गुप्ता यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. घडलेला प्रकार समजताच त्यांनीदेखील खाली धाव घेतली. आसपासच्या लोकांनी गुप्ता यांना रिक्षानं जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. गुप्ता यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरावर शोककळा पसरली आहे.