म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बँक खात्याला पॅन कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांनी नुकताच छडा लावला. तिघांच्या अटकेनंतर पोलिसांनी झारखंडमधील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक मंजित कुमार आर्य (३१) याला अटक केली आहे. डेटा ताब्यात असल्याने साडेतीन हजार बँक खातेदारांच्या खात्यावर डल्ला मारण्याच्या तो तयारीत असतानाच ही कारवाई झाली.

माटुंगा येथे वास्तव्यास असलेल्य़ा ६४ वर्षीय वसंत छेडा यांच्या मोबाइलवर एक संदेश आला. बँक कर्मचारी असल्याचे भासवून पाठविलेल्या या संदेशात तुमच्या खात्याची केवायसी अपडेट नाही. केवायसी अपडेट न केल्यास बँक खाते बंद होईल, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे छेडा यांनी या क्रमांकावर संपर्क केला असता त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही, ऑनलाइन पद्धतीने केवायसी अपडेट करता येईल, असे कथित बँक कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानुसार छेडा यांना बोलण्यात गुंतवून बँक खात्याचा तपशील आणि ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यामधून १ लाख ९ हजार रुपये काढले. छेडा यांनी तक्रार केल्यानंतर माटुंगा पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला.

लाल किल्ल्यावर शिवजयंती का नाही? परवानगी नाकारल्याने वादंग, प्रकरण कोर्टात पोहोचलं

माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी झारखंड आणि नवी दिल्ली येथून तिघांना अटक केली होती. मात्र या टोळीचा सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मंजित कुमार आर्य हा या टोळीचा सूत्रधार असून, तो झारखंडमधील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी शोधमोहीम घेत मंजित याला अटक केली. नोकरीबरोबरच तो सायबर गुन्हेगारांना लिंकद्वारे फसवणुकीचे शिक्षण देणे, तसेच सिम कार्ड व बँक अकाउंट पुरविण्याचे काम करत असल्याचेही समोर आले आहे.

सात लाख खातेदारांचा डेटा लीक

या टोळीची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन नामांकित बँकेच्या जवळपास ७ लाख ६५० खातेदारांचा डेटा सापडला. इतक्या मोठ्या प्रमाणावर डेटा लीक कसा झाला याचा तपास पोलिस करीत आहेत. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here