Nashik Graduates constituency Election results 2023 | अजित पवार यांनी काल नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सत्यजीत तांबे विजयी होतील, असा दावा केला होता. सत्यजीत तांबे हा काँग्रेस पक्षाशी बांधिलकी असणारा नेता होता. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

हायलाइट्स:
- सत्यजीत तांबे यांनी फार ताणू नये
- काँग्रेस पक्षानेही मनाचा मोठेपणा दाखवावा
- सत्यजीत तांबे यांनी मधील एक महिन्याचा काळ विसरुन जावा
यावेळी अजित पवार यांनी गेल्यावर्षी राज्यात झालेल्या सत्तापालटावेळी सुरु असलेल्या अनेक घडामोडींबद्दल गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी आम्ही सर्वांनी उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती. पण उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांवरील अतिआत्मविश्वास नडला, असे अजित पवार यांनी म्हटले. दोन-तीन वेळेला तशाप्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही सर्वांनी, शरद पवार साहेबांनी स्वत: उद्धव ठाकरे यांना सावध केले होते. पवार साहेबांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी तातडीने उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. पण उद्धवजी म्हणायचे, माझा आमच्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतक्या टोकाची भूमिका घेणार नाहीत, असं त्यांना वाटायचं. एकदम सुरुवातीला म्हणजे जूनच्या आधी माझ्या कानावर कुजबुज आली. तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकांच्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि माझ्या भेटीगाठी व्हायच्या, आम्ही जवळ बसायचो. मी त्यांना याबाबत सांगितलं, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याही कानावर या गोष्टी आल्या आहेत. मी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतो. काय असेल ते बघतो, तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, आम्ही मार्ग काढू, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी मला दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी ती चूक सुधारली असती तर….
एकनाथ शिंदे यांच्यासोबत १५-१६ आमदारांचा पहिला गट सुरतला गेला. त्यानंतर शिवसेनेच्या इतर आमदारांना एकजुटीने ठेवण्याची गरज होती. पण तशी गरज दाखवली गेली नाही. शिवसेना नेतृत्त्वाने आपल्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्व ास टाकला आणि त्या विश्वासाला तडा गेला. याबाबतीत उद्धव ठाकरे काहीसे गाफील राहिले, असे म्हणता येईल. आमदारांना न रोखण्याची चूक दुरुस्त करायला पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवला, असे अजित पवार यांनी म्हटले.
नाना पटोलेंचा अजित पवारांना सवाल
अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या गोटातून प्रयत्न झाल्याचे वक्तव्य केले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. ही आरोप-प्रत्यारोपाची वेळ नाही. शिवसेनेचे आमदार गेले तेव्हा राष्ट्रवादीकडे गृहखाते होते, ते या सगळ्या गोष्टी थांबवू शकले असते. अजितदादांनी सत्यजीत तांबे यांच्याविषयी गौप्यस्फोट केला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंना निवडून देण्यासाठी मदत केली, असा अर्थ निघतो. अजित पवार स्वत: तशी कबुली देत आहेत. नाशिकमध्ये शुभांगी पाटील या मविआच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून सत्यजीत तांबेंच्या समर्थनाची भाषा चिंता वाढवणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकद लावली असती तर शुभांगी पाटील निवडून आल्या असत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत अजित पवार यांना विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.