Agriculture News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंगमध्ये जोरदार वाऱ्यामुळं दोन एकर द्राक्ष बाग (Grapes Crop) कोसळली आहे. यामुळं शेतकऱ्यांचे 15 लाख रुपयांच्या आसपास नुकसान झालं आहे. महादेव रंगराव जगताप ( Mahadeo Jagtap) असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वाऱ्यानं बागेच्या आत शिरकाव केला आणि बघता बघता बाग खाली कोसळली.

Grapes Crop : पुढच्या आठ ते दहा दिवसात द्राक्ष बाग सुरु होणार होती 

ही द्राक्ष काही दिवसातच निर्यात करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच बाग कोसळल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी गावातील महादेव रंगराव जगताप यांची खरशिंग हद्दीमध्ये दोन एकर क्षेत्र द्राक्ष बाग होती. पुढच्या आठ ते दहा दिवसात द्राक्ष बाग सुरू होणार होती. अतिशय परिश्रम घेवून जगताप यांनी यावर्षी बाग चांगली जोपासली होती. सकाळी साडेसात वाडण्याच्या दरम्यान जोरदार वाऱ्याने बागेच्या आत शिरकाव केला. बघता बघता एका झपाट्यात बाग खाली कोसळली. बाग कोसळल्यानं शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. कोसळलेली द्राक्ष बाग पाहून शेतकरी रडू लागला. यामध्ये शेतकऱ्याचे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कर्ज काढून बाग सांभाळली होती

महादेव जगताप यांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट निर्माण झाले आहे. त्यांनी सोसायटीतून पाच ते सहा लाख रुपयांचे तसेच बँकेतून सात लाख रुपयांचे कर्ज काढून द्राक्ष बाग लावली होती. सलग दोन वर्षे त्यांना द्राक्ष उत्पादन कमी आले होते. पण यावर्षी त्यांनी बागेकडे चांगले लक्ष दिलं होतं. बागेला मालही बरा होता. अत्यंत गरिबीतून कष्ट करुन त्यांनी कर्ज काढून त्या बागेला सांभाळले होते. मात्र, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. वाऱ्यामुळं त्यांच्या दोन एकर बागेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका

आधीच राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. पिकांवर रोगराई पडत असल्यानं शेतकऱ्यांना त्यावर फवारण्या कराव्या लागतात. या फवारण्याचा मोठा खर्च असतो. कारण फवारणी करण्यासाठी लागणारी औषधे महाग असतात. यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Grapes: दोन वर्षांनंतर द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस, दिड लाख टन द्राक्ष निर्यातीचं ध्येय

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here