देवघेवीच्या वादातून सुशांत खिल्लारेचा भाऊसो माने आणि तुषार पवार या दोघांनी मिळून कराड इथे खून केला होता. त्यानंतर खिल्लारे याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी आंबोली गाठली. ३१ जानेवारीला त्यांनी सायंकाळच्या सुमारास तो मृतदेह आंबोली घाटातील खोल दरीत फेकून दिला. याच वेळी या खुनातील मुख्य संशयित भाऊसो माने हा सुद्धा मृतदेहासह पाय घसरून खोल दरीत कोसळला आणि त्याचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर पवार यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना आपले साथीदार घाटातील दरीत कोसळल्याची माहिती दिली. मात्र, प्रकरण संशयास्पद वाटू लागल्याने झालेल्या तपासाअंती अपघात, नाहीतर हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीसह पवार याला ताब्यात घेण्यात आले होते.
दरम्यान, सुशांत खिल्लारे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुषार माने याच्यावर खून, अॅट्रॉसिटी, पुरावा नष्ट करणे आणि अपहरण या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. तर त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी आपल्या पथकासह गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची तपासणी केली. त्यातील काही साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. त्यात मारहाणीसाठी वापरण्यात आलेल्या कंबर पट्ट्याचाही समावेश आहे. तर आणखीन काही पुरावे मिळतील का ? या दृष्टीने तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडून संशयिताला ७ दिवसांची पोलीस कोठडी मागून घेतली आहे.