विरार : पतीनेच नवविवाहित पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना विरार येथे घडली आहे. प्रियांका उर्फ पिंकी पाटील (वय २५) असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी हत्या करण्यात सामील असलेल्या पतीच्या मित्राला अटक केली असून आरोपी पती फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका पाटील हिचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी विरार पूर्व, शंकरपाडा येथील जीवदानी अपार्टमेंटमध्ये तिच्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. प्रियांकाचा मृतदेह आढळल्यापासून तिचा पती फरार होता, तसेच त्याचा मोबाईल देखील बंद असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय होता.

​पुण्यातील भीषण अपघातात आई-मुलाचा करुण अंत; महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्नही अधुरं

प्रियांकाच्या पतीने ‘आई-वडील, मला माफ करा, मी काही चुकीचं पाऊल उचलत आहे’ असं स्टेटस त्याच्या व्हॉट्सॲपवर ठेवलं होतं. या व्हॉट्सअॅप स्टेटसच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हत्येचा उलगडा झाला आहे.

दरम्यान, प्रियांका पाटील ही एका कंपनीत कामाला होती. तिथे तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ती व तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत असत. चारित्र्याच्या संशयावरून मित्राच्या मदतीने पतीने गळा आवळून राहत्या घरात पत्नी प्रियांकाची हत्या केली. याप्रकरणी हत्या करणाऱ्या दोन आरोपींपैकी पतीच्या मित्राला पोलिसांनी अटक केली असून आरोपी पती फरार आहे. त्याचा शोध विरार पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here