mahavikas aghadi candidate, आघाडीतील तिढा सुटला; कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ही २ नावे निश्चित? – congress ncp candidates for by elections in kasba and chinchwad constituencies
पुणे : कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांतील आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मोठा खल केल्यानंतर आज भाजपकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कसब्यातून हेमंत रासने हे तर चिंचवडमधून अश्विनी जगताप या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. भाजपने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींना वेग आला असून कसबा आणि चिंचवडच्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, हे आघाडीच्या नेत्यांकडून निश्चित करण्याची आल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार असून चिंचवडची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे. आघाडीत गेल्या अनेक वर्षांपासून कसब्याची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आक्रमकपणे या जागेची मागणी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून ही जागा अखेर काँग्रेसला सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे चिंचवडमधील राष्ट्रवादीचं प्राबल्य पाहता या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाणार आहे. मोठी बातमी : कसबा आणि चिंचवडच्या जागेसाठी भाजपकडून अखेर उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी?
कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब?
कसबा आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र कसब्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर चिंचवडमधून राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित केल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्रक काढून ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघात २७० मतदान केंद्रे, तर चिंचवड मतदारसंघात ५१० मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपीएटी मशीन असणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण ७८० मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी एकूण एक हजार ७२० ईव्हीएम मशीन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्व मशीनची पहिल्या टप्प्यातील तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा या मशिनची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.