नवी दिल्ली: हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालामुळे अदानी समूह अडचणीत आला आहे. हिंडनबर्गच्या १०६ पानी अहवालानं अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावला आहे. कंपन्यांचे शेअर ६० टक्क्यांपेक्षा अधिक घसरले आहेत. तोटा १० लाख कोटींच्या पुढे गेला आहे. श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत जगात दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचलेले अदानी आता पहिल्या २० मध्येही नाहीत. गेल्या वर्षभरात अदानी यांनी जितकी संपत्ती कमावली, तितकी पाच दिवसांत गमावली आहे. त्यातच आता अदानींना बांगलादेशनं झटका दिला आहे.

अदानी समूह अडचणीत आल्यानंतर आता बाकीचे देश सतर्क झाले आहेत. त्यात बांगलादेशचाही समावेश आहे. बांगलादेशनं अदानी पॉवर लिमिटेडनसोबत २०१७ मध्ये वीज खरेदीसाठी करार केला. त्यात सुधारणा करण्याची मागणी बांगलादेशनं केली आहे. अदानी समूहानं निश्चित केलेले वीज दर जास्त आहेत. ते कमी व्हायला हवेत, अशी मागणी बांगलादेश सरकारनं केली आहे.

अदानी पॉवर आणि बांगलादेशमधला करार काय?
अदानी पॉवर लिमिटेडनं झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात ऊर्जा निर्मिती केंद्र सुरू करत आहे. या केंद्राची क्षमता १६०० मेगावॉट इतकी आहे. या केंद्रातून बांगलादेशला वीज पाठवली जाईल. बांगलादेश सध्या भारताकडून ११६० मेगावॉट वीज आयात करतो. २०१७ च्या करारानुसार गोड्डा केंद्रातून निर्माण होणारी १६०० मेगावॉट वीज बांगलादेशला पाठवली जाईल. अदानी समूह आणि बांगलादेशमधील करार २५ वर्षांचा आहे. यंदाच्या मार्चपासून बांगलादेशला गोड्डामधून वीज मिळू लागेल.
अदानींपाठोपाठ रामदेव बाबांच्या कंपन्यांच्या शेअर्सची घसरण, गुंतवणूकदारांचे हजारो कोटी बुडाले
आता काय झालं?
बांगलादेश वीज विकास बोर्डानं (BPDB) वीज खरेदी करारतील बदलांसाठी अदानी समूहाला पत्र पाठवलं आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोळशाच्या दरांचा पुनर्विचार करण्यात यावा, असं बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कोळशाच्या आयातीसंदर्भात अदानी समूहानं BPDBला लेटर ऑफ क्रेडिट उघडण्यासाठी पत्र पाठवलं आहे. भारत सरकारकडून लेटर ऑफ क्रेडिट घेण्यासाठी BPDBकडून डिमांड नोट घेणं गरजेचं आहे. वीज निर्मिती खरेदी करण्यासाठी अदानी पॉवर खरेदी करणार असलेल्या कोळशाच्या दरांचं ओझं अंतिमत: बांगलादेशवर पडणार असल्याचं BPDBच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष, अंबानींनी दलालांना गुडघे टेकायला लावले!
बांगलादेशची मागणी काय?
अदानी समूहानं बांगलादेशला डिमांड नोट पाठवली आहे. त्यात प्रति मेट्रिक टन कोळशाचा दर ४०० डॉलर (३२,८९७ रुपये) नमूद करण्यात आला आहे. हा दर अतिशय जास्त असल्याचं BPDBच्या अधिकाऱ्यांना म्हटलं आहे. ही किंमत २५० डॉलर (२०,५६१ रुपये) असावी, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. इतर वीज केंद्रांसाठीही आम्ही हाच दर मोजत असल्याचा उल्लेख पत्रात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here