पालघर : ट्रक आणि दुचाकीचा मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण असा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वार दांपत्याचा जागीच मृत्यू झाला असून नवशा लक्ष्मण पारधी व सुमन पारधी अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.
या धडकेत दुचाकीस्वार दांपत्य दुचाकीवरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश गावच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर अज्ञात मालवाहू ट्रकचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व दोन्हीही मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दुचाकीला धडक देऊन फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध मनोर पोलीस घेत आहेत.