पुणे: भाजपने कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये मोठी अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात तिकीट द्यावं, अशी मागणी होत असताना भाजपने मात्र हेमंत रासने यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कसब्याचा गड राखण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, आता रासने यांच्या उमेदवारी नंतर कसब्यात भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने कसब्यात बॅनर लावण्यात आले असून या बॅनरच्या माध्यमातून ब्राम्हण समाजावर अन्याय झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे. त्यामुळे हाच धागा पकडत आता हिंदू महासंघ देखील कसब्याच्या रिंगणात उतरले आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे हे आता कसब्याच्या रिंगणात उतरले आहेत. आनंद दवे हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ‘कसबा मतदारसंघातून हिंदू महासंघाचा उमेदवार म्हणून उद्या मी स्वतः अर्ज भरतोय. ही निवडणूक चुरशीची आणि जिद्दीची सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी जेव्हा लोक टिंगळी टवाळ्या करत होती तेव्हा ज्या समाजाने भारतीय जनता पक्ष वाढवण्याचे सर्वाधिक प्रयत्न केले. त्या समाजाला वाळीत टाकण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय’. असं आनंद दवे म्हणाले आहेत.

दरम्यान, कोथरूडचा विषय असो की कसब्याचा पिंपरी चिंचवड मध्ये जगताप कुटुंबीयांना जो न्याय देण्यात आला तो न्याय टिळकांच्या घराला कसब्यामध्ये का देता आला नाही?, पुणे जिल्ह्यात २१ आमदार असताना प्रत्येक समाजाचं चांगल्या प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाला का डावललं गेलं? हा हिंदू महासंघाचा भाजपला प्रश्न आहे. प्रत्येक समाजाचा नेता त्या समाजाचे प्रश्न सुद्धा मांडत असतो. त्यासाठी राखीव मतदारसंघ सुद्धा असतात हे भारतीय जनता पक्षाला तर माहित नाहीये का हे विचारण्याची वेळ आलीय. असं देखील आनंद दवे म्हणाले आहेत.
पुण्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली; कसब्यात बंडखोरीची भीती तर मोठा नेता भाजपच्या वाटेवर?
यामुळेच स्वतः मी कसब्याच्या रिंगणात उतरण्याचा विचार केलेला आहे. आम्ही उद्या फॉर्म भरतोय. कसब्यात लागलेले सगळे बॅनर असतील. आज टिळक कुटुंब, नगरसेवक किंवा पदाधिकारी हेमंत रासने यांच्या मिरवणुकीत न जाण असेल. ही भारतीय जनता पक्षाला धोक्याची सूचना आहे.
हिंदू महासंघाचा उमेदवार निवडून येईल याची खात्री आहे, असे देखील आनंद दवे म्हणाले आहेत.
Kasba Bypoll: गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक, कसब्यात भाजपने हेमंत रासनेंना उमेदवारी का दिली?
दुसरीकडे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर आता या पोटनिवडणुकीत टिळकांचे तिकीट कापत ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. दुसरीकडे आजारी असलेले भाजप खासदार गिरीश बापट यांना देखील डावलून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप नवीन चेहरा देण्याचा तयारीत असल्याने ब्राम्हण समाज भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here