महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचं एकमेकांशी वैमनस्य आहे. ते संपलं पाहिजे. या सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. मात्र, या सगळ्यात नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीमुळे अडथळा येत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसमधील तरुण नेत्यांना बाहेर ढकलायचे काम करत आहेत का, हा प्रश्न मला पडला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ, निष्ठावान आणि प्रगल्भ नेत्यानेही नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे, याकडे आशिष देशमुख यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बाळासाहेब थोरातांनी हायकमांडला पाठवलं पत्र
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये रंगलेले अंतर्गत राजकारण चर्चेचा विषय ठरले होते. सत्यजीत तांबे यांना पक्षाकडून वेळेवर एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगितले जाते. या सगळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार ठरवले जात आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले आणि महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले यांनी जाणुनबुजून एबी फॉर्म देण्यास विलंब लावला आणि त्यामध्ये गोंधळ घातला. जेणेकरून मला काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरता येऊ नये, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले होते. या सगळ्यावर नाना पटोले यांनी उत्तर देणे टाळले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्यांकरवी सत्यजीत तांबे यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. तसेच सत्यजीत तांबे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले होते.
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवा: आशिष देशमुख
नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने कॉंग्रेसश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काळ बदलण्याची नितांत गरज आहे. प्रदेशाध्यक्ष असा असावा, जो महाराष्ट्राच्या गावां-गावांत फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्यांस वाचा फोडेल आणि कॉंग्रेसची स्थिती मजबूत करेल, असा आशयाचे पत्र आशिष देशमुख यांनी हायकमांडला पाठवले होते.