मुंबई: राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जायला तयार आहोत, या प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्तव्याची शिवसेनेने खिल्ली उडवली आहे. राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले म्हणजे राज्याचे हित, अन्यथा नाही, असा टोला लगावतानाच भाजपची मगरमिठी स्वीकारली म्हणजेच राज्याचे हित या भ्रमात कुणी राहू नये, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्री पद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरू आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेची टीका

>> महाराष्ट्रासारख्या राज्यात मनासारखे राजकारण घडले नाही म्हणून राज्याच्या अस्तित्वावरच शिंतोडे उडवायचे हा उद्योग बरा नव्हे! नड्डा म्हणतात, ‘‘स्वबळावर सत्ता आणू. आक्रमक व्हा!’’ त्याच वेळी देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे खरा. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे!

>> विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे व राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडावे हे योग्यच आहे. विरोधी पक्ष जितका आक्रमक व सावध तितके सरकारचे काम पारदर्शक होत असते. त्यादृष्टीने नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.

>> भाजपने आक्रमणाच्या तोफा फक्त महाराष्ट्रातच उडवल्या असे नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांडय़ास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नाही.

>> नड्डा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणारे त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण केले, पण त्यांनी सत्य सांगितले नाही. ‘‘महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे,’’ असा टोला श्री. नड्डा यांनी मारला. भारतीय जनता पक्ष सध्या जे राजकारण करीत आहे ते असे कोणते परमार्थाचे लागून गेले आहे! मध्य प्रदेशात त्यांनी सरकार पाडले ते काय संतसज्जनांचा मेळा जमवून नक्कीच पाडले नाही. राजस्थानमध्येही मंत्रोच्चार वगैरे करून तेथील सरकार अस्थिर केले नाही, तर सरळ सरळ पैशांचा वारेमाप वापर करून आवश्यक ते बहुमत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रावर टीका करण्याआधी हे सत्य स्वीकारले पाहिजे.

>> करोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत सक्षमतेने हाताळली असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणत असतील तर आम्ही त्यांचे विधान खोडणार नाही, पण मोदी तेवढे बरे काम करीत आहेत व ज्या राज्यात विरोधकांची सरकारे आहेत तेथेच फक्त कोरोनाबाबत भ्रष्टाचार व सावळागोंधळ आहे, असे सांगणे हे निरोगी राजकारणाचे लक्षण नाही. जर राज्यात कोरोना संकट वाढले असेल व तेथे अपयश दिसत असेल तर त्या अपयशाची जबाबदारी देशाचे नेते म्हणजे पंतप्रधानांवर येतेच. गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक या राज्यांत कोरोना महामारीने जे अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले आहे, त्याची संपूर्ण माहिती आम्ही महाराष्ट्र किंवा दिल्लीच्या भाजप कार्यालयात पाठवायला तयार आहोत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here