लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलं असताना नववधूचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्र परिवाराला जबर धक्का बसला आहे. घटनेबद्दल समजताच पोलीस पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
२०११ मध्ये पोलीस दलात भरती
सरधनातील अहमदाबाद गावात वास्तव्यास असलेली गीता उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत होती. सध्या ती मुझफ्फरनगर दक्षता पथकात काम करत होती. गीता २०११ मध्ये पोलीस दलात भरती झाली. ७ फेब्रुवारीला तिचा विवाह होता. घरात लग्नाचे विधी सुरू होते. रविवारी हळदीचा कार्यक्रम झाला. तो मोठ्या थाटामाटात आणि आनंदात संपन्न झाला. त्यानंतर गीता आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. तिथेच तिनं शेवटचा श्वास घेतला.
गीताचा विवाह बुलंदशहरच्या गुलावठीत वास्तव्यास असलेल्या सुमित तेवतियासोबत होणार होता. सुमितदेखील पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. तो सध्या गाझियाबादमध्ये तैनात आहे. ७ फेब्रुवारीला मेरठच्या ‘द रिव्हर व्ह्यू बँक्वेट हॉल’मध्ये विवाह संपन्न होणार होता. मात्र त्याच्या दोन दिवसआधी गीताचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.