congress nana patole, थोरातांसोबत नाना पटोले जुळवून घेण्याच्या तयारीत? नाराजीच्या चर्चेबद्दल मांडली सविस्तर भूमिका – congress leader nana patole reaction on balasaheb thorat and dispute in party
नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादंगानंतर काँग्रेसमध्ये मोठं वादळ निर्माण झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचं उघड झालं असून पटोले यांच्याविरोधात त्यांनी हायकमांडकडे तक्रार केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आज नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी पटोले यांनी संयमी भाषा वापरत आपण थोरात यांच्याशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत.
‘मी काँग्रेसचा आमदार आहे आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आहेत. त्यामुळे ते आमचे नेते असून नेत्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. १५ फेब्रुवारी रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर राजकीय विषयांबाबत चर्चा होईल,’ अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. अदानींच्या मागे आता शिवसेना लागली; शिंदे सरकारकडून झालेल्या मुलाच्या नियुक्तीला विरोध
‘बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याबाबत माझ्याकडे अद्याप माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे, एवढंच मला माहीत आहे. मी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत,’ असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी काम करत असून कोण काय राजकारण करत आहे, याकडे मला लक्ष घालायचं नाही, असंही ते म्हणाले.
एकीकडे बाळासाहेब थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा असताना दुसरीकडे नाना पटोले यांनी थोरातांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांच्या गटनेतेपदासह सर्व पदांचा उल्लेख केला आहे.
नेमकं काय आहे नाना पटोले यांचं ट्वीट?
‘कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा,’ अशा शब्दांत नाना पटोले यांनी आपले सहकारी असलेल्या थोरात यांना शुभेच्छा दिल्या आहेत.