काही दिवसांपूर्वीच अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर आज अभिजित बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन रितसर उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणं हे मला भाग आहे. मी दोन वर्षांपासून कसबा पेठेत राहतोय. मग या लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी ‘कसबा भकास झाला’ असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे, असे अभिजित बिचुकले यांनी सांगितले.
अभिजित बिचुकले हे कायमच त्यांचा अनोखा स्टाईल सेन्स, शैली आणि वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यामुळे कसबा निवडणुकीतील त्यांचा प्रचार नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासारखे तगडे उमेदवार समोर असताना अभिजित बिचुकले कोणत्या मुद्द्यावर कसब्यातील मतदारांना साद घालणार, हे पाहावे लागेल.
बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेत वाद
अभिजित बिचुकले आज दुपारच्या वेळेस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी बाहेर उभे असलेल्या लहुजी लहुजी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला. लहुजी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी अभिजित बिचुकले यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा अभिजित बिचुकले यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोटो काढायचा असेल तर गळ्यातील लहुजींचा रुमाल काढावा लागेल, असे म्हटले. या गोष्टीचा लहुजी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राग आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे आणि अभिजित बिचुकले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अभिजित बिचुकले विजयाचा दुष्काळ संपवणार का?
यापूर्वी अभिजित बिचुकले यांनी आमदारकी, खासदारकीपासून ते अगदी राष्ट्रपतीपद अशा सर्व निवडणुका लढवून झाल्या आहेत. २०१९ साली त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आजपर्यंत त्यांना एकाही निवडणुकीत यश मिळाले नव्हते. त्यामुळे आता कसब्यात अभिजित बिचुकले यांना किती मतं मिळणार, हे पाहावे लागेल.