म्हैसूर: कर्नाटकमधील म्हैसूरमध्ये सोमवारी एकाचा झाडावर मृत्यू झाला. ६० वर्षांचा वृद्ध म्हैसूर रोड परिसरातील विजयश्री लेआऊटमधील माडाच्या झाडावर चढला होता. ५० फुटांच्या झाडावर चढल्यानंतर वृद्धानं नारळ काढण्यास सुरुवात केली. माडाच्या झाडावर बसला असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला.

सकाळी ११ च्या सुमारास एक पादचारी माडाजवळून जात होता. त्यानं केनगेरी पोलिसांना फोन केला. ‘एक व्यक्ती तास उलटून गेला तरी माडाच्या झाडावर बसला आहे. तो काहीच हालचाल करत नाहीए,’ अशी माहिती पादचाऱ्यानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा देणारे कर्मचारीदेखील व्यंकटरमन मंदिराजवळ असलेल्या माडाच्या झाडाजवळ दाखल झाले.
हळद लागली, नवरी सजली; आंघोळीला गेली, ती बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावलं तर…
हळूहळू माडाखाली बरीच गर्दी जमली. सगळ्यांचंच लक्ष माडाच्या झाडावर निश्चल स्थितीतील वृद्धाकडे लागलं होतं. माडाखाली कोयता, दोरी आणि गोणी दिसत होती. अग्निशमन दलानं शिडी आणली. मात्र शिडी २५ फुटांची असल्यानं ती माडाच्या टोकापर्यंत पोहोचत नव्हती. दरम्यान काही स्थानिकांनी माडावर चढण्याचे प्रयत्न केले. मात्र ते वाया गेले.

अखेर पोलिसांनी एका क्रेन मालकाशी संपर्क साधला. क्रेनच्या मदतीनं वृद्धाला खाली आणण्यात आलं. तो अजिबात हालचाल करत नव्हता. त्याचं शरीर गार पडलं होतं. त्यानं माडाच्या झावळ्या घट्ट धरल्या होत्या. जवळपास तासभर कोणतीच हालचाल न करता बसलेला असल्यानं त्याचे स्नानू आकसले होते.
सुसाट पळणारी बाईक थांबवली, पोलिसांना संशय; टाकी उघडायला लावली, आत पेट्रोल नव्हतंच; मग काय?
पोलिसांनी वृद्धाला केनगेरीतील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नारायणप्पा असं वृद्धाचं नाव आहे. ते म्यालासंड्राचे रहिवासी आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानं नारायणप्पा यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ‘आमच्यातले अनेक जण गेल्या २५ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. मात्र इतक्या प्रदीर्घ कालावधीत असा प्रकार पहिल्यांदाच पाहत आहोत,’ असं डॉक्टर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here