म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एखादी करोनाबाधित व्यक्ती करोनामुक्त झाल्यानंतर म्हणजेच १४ दिवसांनी संबंधित व्यक्तीपासून कुणालाही करगोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना घाबरण्याचे किंवा अशांना दूर ठेवण्याचे काहीही कारण नाही; तसेच अशा व्यक्तींशी भेदभाव होऊ नये, अशीही अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मुळात करोनाच्या विषाणूचे आयुष्य हे १४ दिवसांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती करोनाबाधित झाली तर लक्षणे दिसू लागल्यानंतर दहा दिवसांपर्यंत अशा व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होऊ शकतो, असे सांगताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ‘एखाद्या बाधित व्यक्तीला संसर्ग झाला व लक्षणे दिसू लागली तर, अशा व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले जाते व इतर कोणतीही गुंतागुंत नसल्यास दहाव्या दिवशी घरी सोडले जाते. खरे तर अशा करोनामुक्त व्यक्तीकडून दहा दिवसानंतर इतरांना संसर्गाची शक्यता नसते. अर्थात, दहाव्या दिवशी करोनामुक्त व्यक्तीला सुट्टी दिल्यानंतर सात दिवस ‘होम क्वारंटाइन’चा सल्ला दिला जातो आणि त्यानंतरच अशी व्यक्ती आपल्या कामावर परतू शकते. त्यामुळे साहजिकच १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होतो व १४ दिवसानंतर करोनामुक्त व्यक्तीकडून संसर्गाची कोणतीच शक्यता नसते. सुट्टी दिल्यानंतरच्या सात दिवसांत अशा व्यक्तीला काही त्रास असल्यास कळवण्याबाबत निक्षून सांगितले जाते. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशा व्यक्ती सात दिवसांच्या विश्रांतीनंतर कामावर परतू शकतात.’

तीन आठवडे विश्रांतीची अनेकांना गरज

करोनामुक्त झालेल्या अनेक व्यक्तींना करोनामुक्तीनंतर कमालीचा थकवा आलेला असतो व त्यामुळेच अशा व्यक्तींनी रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर तीन आठवड्यांपर्यंत घरीच विश्रांती घेतलेली उत्तम. त्याचवेळी करोनामुक्त व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा संपर्कातून इतरांना संसर्गाची शक्यता नसली तरी, करोनामुक्त व्यक्तीच्या शौच्चातून ४० दिवसांपर्यंत विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता काही अभ्यासामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा करोनामुक्त व्यक्तीचे स्वच्छतागृह इतरांनी ४० दिवसांपर्यंत न वापरलेले चांगले, असे ‘फिजिशियन्स असोसिएशन’चे शहराध्यक्ष डॉ. संजय पाटणे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

करोनामुक्त व्यक्तीपासून १४ दिवसानंतर दुसऱ्याला संसर्ग होण्याची कोणतीही शक्यता नसते. त्यामुळे अशा करोनामुक्त व्यक्तींना विनाकारण घाबरू नये किंवा अशा व्यक्तींशी भेदभाव करू नये.

– डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

करोनामुक्त व्यक्तीला ‘म्युटेशन’मुळे पूर्वीपेक्षा वेगळ्या जातीच्या (स्ट्रेन) विषाणूपासून संसर्ग होऊ शकतो, असे शास्त्रीयदृष्ट्या मानण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात अशी उदाहरणे समोर आलेली नाहीत.

– डॉ. संजय पाटणे, शहर अध्यक्ष, फिजिशियन्स असोसिएशन

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here