ठाणे : शहरातील दिवा परिसरात एका ६० वर्षीय विकृत वयोवृद्धाने दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात ६० वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलिसांनी या त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

ठाण्यातील दिवा पूर्व येथील ओंकार नगर परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय आरोपीने ९ वर्षीय आणि ७ वर्षीय अशा एकाच घरातील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले. या दोन्ही चिमुकल्या सख्ख्या बहिणी आहेत. तसेच हा ६० वर्षीय नराधम आणि पीडित मुली या शेजारी-शेजारी राहतात. आरोपीने दोघी बहिणींना खाऊ देण्याचे आमिष दाखवत आपल्या घरी अभ्यासाला बोलावले. याच संधीचा फायदा घेत या नराधमाने आधी ९ वर्षीय चिमुकलीला अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा विकृत नराधम एवढ्यावरच न थांबता त्या चिमुकलीला व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दिसतंय त्याप्रकारे सर्व करण्यासाठी भाग पाडू लागला. तसंच त्याने ७ वर्षीय तरुणीसोबत देखील अशाच प्रकारे लैंगिक चाळे करत दोन्ही चिमुकलींसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. १६ जानेवारी २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान या नराधमाने अनेकवेळा असे कृत्य केलं आहे.

मुलींसाठी नाश्ता घ्यायला उतरल्या, चालत्या रेल्वेत चढायला गेल्या पण फलाट अन् रुळामध्ये पडल्या…

आपल्यासोबत वारंवार घडत असलेला हा प्रकार चिमुकलींनी घरी आपल्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मुलींच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत या ६० वर्षीय विकृत नराधमाविरोधात ६ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरुद्ध अल्पवयीन तथा बालकांसोबत लैंगिक अत्याचार, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. तसेच त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here