सुनील नलावडे, रत्नागिरी: राज्यातले सरकार राष्ट्रवादीचेच असून राज्यात काहीही करायचे असल्यास या सरकारला बारामतीत जाऊन परवानगी घ्यावी लागणार आहे, असा खोचक टोला हाणत भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.

नागपुरात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचा मुख्यमंत्री अभ्यासू नाहीत तर अज्ञानी आहेत. कोणताही प्रश्न विचारला तर त्याच्या उत्तरासाठी एकतर जयंत पाटील यांच्याकडे किंवा बाळासाहेब थोरात यांच्याकडे बोट दाखवले जाते. हे दोघे नसले तर सुभाष देसाई यांच्याकडे बोट वळते. अशी विचित्र अवस्था या सरकारची आहे, असे टीकास्त्र राणे यांन सोडले.

महाविकास आघाडीचे सरकार फारकाळ टिकणार नाही. राज्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकारला येणार आहे. त्याच मार्गावर आम्ही सध्या आहोत, असे राणे म्हणाले. भाजपचे सरकार कोणाच्या पाठिंब्यावर येणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र राणे यांनी दिले नाही. रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत दाखल झालेले राणे पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेवर निशाणा

रत्नागिरी शहराच्या विकासावरून राणे यांनी यावेळी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ‘रत्नागिरी शहराला असलेली पार्श्वभूमी व इतिहास पाहता कोणतीही ठोस विकासकामे गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेने केलेली नाहीत. शहरात साधी भुयारी गटारे शहरात होऊ शकली नाहीत. एकेकाळी रत्नागिरी हे शहर ‘शैक्षणिक हब’ म्हटले जायचे मात्र आता ती स्थिती राहिली नसल्याची खंत नारायण राणे यांनी बोलून दाखवली. शहराचा विकास करण्यासाठी आताचे सरकार निधी देऊ शकणार नाही मात्र या शहरासाठी हवातेवढा निधी केंद्र सरकारकडून मिळवून देण्याची हमी देऊन अडीच वर्षांत शहराचा कायापालट करू असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. मी स्वतः शहर विकासासाठी नगराध्यक्षांच्या पाठी राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here