पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्र ठरत असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या अनेक कारणांनी गाजत आहे. या पोटनिवडणुकीत टिळक घराण्यातील व्यक्तीला संधी न मिळाल्यामुळे कसब्यातील ब्राह्मण समाज भाजपवर प्रचंड नाराज झाल्याची चर्चा होती. हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपमधील अन्य इच्छूक उमेदवारही नाखूश होते. यामध्ये धीरज घाटे यांच्या नाराजीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी धीरज घाटे यांनी समजूत काढून या वादावर पडदा टाकला.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी धीरज घाटे यांना मुंबईला बोलावून घेतले होते. सह्याद्री अतिथीगृहावर या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी फडणवीसांनी शेजारी बसवून धीरज घाटे यांची समजूत काढली. ‘धीरज तुझं काय आता वय झालं का.. तुला आणखी भरपूर संधी आहे’, असे फडणवीस यांनी म्हटले. यानंतर धीरज घाटे यांनी हेमंत रासने यांच्या विजयासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू असा शब्द देवेंद्र फडणवीस यांना दिला.
Kasba Bypoll: फॉर्म अन् कागदपत्रं तयार, भाजप टिळकांना उमेदवारी द्यायला तयार, पण एक अट: चंद्रशेखर बावनकुळे
गेल्या काही वर्षांपासून धीरज घाटे यांच्याकडून कसबा विधानसभा मतदारसंघात आपली प्रतिमानिर्मिती केली जात होती. भाजपमध्ये अनेक संघटनात्मक पदांवर काम करताना घाटे यांनी आपली छाप उमटवली होती. त्यामुळे कसब्याचा पुढचा आमदार म्हणून धीरज घाटे यांच्या नावाची कायम चर्चा असायची. त्यामुळे साहजिकच पोटनिवडणुकीत पक्ष आपल्याला संधी देईल, अशी धीरज घाटे यांची अपेक्षा होती. परंतु, हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्याने धीरज घाटे यांचा भ्रमनिरास झाला होता. यानंतर धीरज घाटे यांची भावजय आणि माजी नगरसेविका मनीषा घाटे यांनीही सोशल मीडियावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धीरज घाटे यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती. यानंतर धीरज घाटे यांची नाराजी दूर झाली होती.

आमदारकीचे तिकीट मिळेल वाटलेलं पण… वहिनीची जाहीर खंत, बावनकुळे धीरज घाटेंच्या भेटीला

हेमंत रासनेंचा उमेदवारी अर्ज भरताना चंद्रकांत पाटलांकडे व्यक्त केली होती नाराजी

धीरज घाटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे कसब्यातील संभाव्य भाजप उमेदवारांमध्ये धीरज घाटे यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. परंतु, भाजपने अंतर्गत सर्वेक्षणांच्या आधारे ऐनवेळी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाताना स्पष्टवक्ते असलेल्या धीरज घाटे यांनी आपली नाराजी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना स्पष्टपणे बोलून दाखवली होती.

हेमंत रासने यांचा अर्ज भरायला जाताना गाडीत जागा नव्हती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी धीरज घाटे यांच्या मांडीवर बसून प्रवास केला. तेव्हा घाटे म्हणाले होते की, ‘पालकमंत्र्यांनीच आम्हाला मांडीवर घ्यायला हवं होतं.’ त्यावर शेजारीच बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘धीरज योग्य वेळ आली की तुलाही मांडीवर घेऊ’, असे सूचक वक्तव्य केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here