Praful Patel Worli property | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची जप्त केलेली मालमत्ता आता ईडीच्या ताब्यात जाणार आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचा आणखी एक नेता गोत्यात.

हायलाइट्स:
- ‘सीजय हाऊस’ इमारतीतील मालमत्ता
- या जागेचे सध्याचे बाजार मूल्य १०० कोटी रुपये आहे
मिलेनियम डेव्हलपर्स ही प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीतील बांधकाम कंपनी होती. या कंपनीने २००६-०७ मध्ये दक्षिण मुंबईतील वरळीत ‘सीजय हाऊस’ इमारत बांधली. ज्या जमनीवर ही इमारत बांधण्यात आली, ती जमीन गुंड इक्बाल मिर्चीची होती. इक्बाल हा कुख्यात दाऊद इब्राहिमचे मुंबईतील काम पाहत होता. त्याच्या जमिनीवर ही इमारत बांधण्यात आल्याच्या मोबदल्यात इमारतीचा तिसरा व चौथा माळा पटेल यांच्या बांधकाम कंपनीने इक्बालची पत्नी हाझरा मिर्ची हिच्याकडे हस्तांतरित केला. पुढे इक्बाल मिर्चीचे नाव हवाला घोटाळ्यात आले. त्यामुळे ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी त्याची सर्व मालमत्ता ही हवालाच्या पैशांमधून खरेदी झाल्याचे समोर आले. त्यामुळेच ‘सीजय हाऊस’ विरुद्धदेखील ‘ईडी’ने कारवाई केली. याअंतर्गत इमारतीचा तिसरा व चौथा माळा जप्त करण्यात आला होता. त्या जागेचे सध्याचे बाजार मूल्य १०० कोटी रुपये आहे.
‘ईडी’तील सूत्रांनुसार, याच इमारतीत प्रफुल्ल पटेल यांचादेखील फ्लॅट आहे. वरच्या माळ्यावर जवळपास ३५०० चौरस फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट त्यांच्या मालकीचा आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांचीदेखील ‘ईडी’ने या प्रकरणात तब्बल १२ तास चौकशी करुन जबाब नोंदवला होता. त्यानंतर या इमारतीतील सर्व चार माळे जप्त करण्यात आले होते. त्यावर आता ‘ईडी’ने मोहोर उठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी नेता गोत्यात येणार?
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. यापैकी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले होते. देशमुख काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आले होते. तर कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरीही अलीकडेच ईडीची धाड पडली होती. तेव्हापासून हसन मुश्रीफ यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्या पाठिशी ईडीचा ससेमिरा लागणार का, हे पाहावे लागेल. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.