कोल्हापूर: संसर्गाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर घरात वावरताना सुद्धा मास्क वापरण्याच्या सूचना महापालिकेने दिले आहेत. एकाच घरात अनेकांना करोनाची बाधा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे .

कोल्हापुरात गेल्या आठ दहा दिवसात एक हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिवसाला जवळ जवळ शंभर रुग्ण आढळत असल्याने आणि शहरातील काही भाग हॉटस्पॉट झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचारासाठी रुग्णालय कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना संसर्ग रोखण्यासाठी घरातही मास्क वापरण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत.

हेही वाचा:

एका घरात चार ते पाच जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याचे मागील दोन दिवसात निदर्शनास आले आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेर जाताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. न वापरल्यास शंभर रुपये दंड केला जात आहे पण घरात वावरताना मास्क वापरला जात नसल्याने घरातील एखादा पॉझिटिव्ह असल्यास त्याचा संसर्ग घरातील सर्वांना होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. टिंबर मार्केट, जवाहरनगर, ताराबाई पार्क या भागात हा आकडा जास्त आहे.

मंगळवारी दिवसभरात शहरात ११० करोना बाधित रुग्ण आढळले. आत्तापर्यंतचा शहरातील आकडा ११२४ पर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १४२ लोकांचा बळी गेला असून पाच हजारावर लोकांना करोनाची बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातही अनेक उपाय योजना सुरू केले आहेत. त्यामध्ये घरातही मास्क घालण्याच्या सूचना आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here