सांगली : घरकुलाचा प्रस्ताव का जमा केला नाही? या कारणातून ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने एका महिला ग्रामसेविकेला जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी आवंढी येथील ग्रामसेविकेने जत तालुका पोलीस ठाण्यामध्ये राजेश कोडग या ग्रामपंचायत महिला सदस्याच्या पतीवर विनयभंग, जातीवाचक आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जत पंचायत समितीमध्ये १ फेब्रुवारी रोजी घरकुल संदर्भात गटविकास अधिकारी घरकुल विभाग आणि ग्रामसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये उपसरपंच अमोल कोडग यांनी महिला ग्रामसेविकेला आवंढी गावातील शीतल धनाजी कोडग यांचा घरकुल प्रस्ताव दिला होता. आता काही कागदपत्रांची पूर्तता नसल्याने महिला ग्रामसेवकांनी तो प्रस्ताव घरकुल विभागात सादर केला नव्हता.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी बोर्डाने जारी केले नवे नियम
दरम्यान, दुसऱ्या दिवशी ते कामाच्या निमित्ताने कोल्हापूर या ठिकाणी गेल्या होत्या. यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या कार्यालयीन कामकाजासाठी आवंढी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोहोचल्या होत्या. कामकाज करत असताना त्या ठिकाणी आवंढी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य प्रज्ञा कोडग यांचे पती राजेश कोडग पोहचले होते. यावेळी त्यांनी शीतल कोडग यांच्या घरकुलाचा प्रस्ताव का सादर केला नाही? अशी विचारणा सुरू केली. यावर संबंधित महिला ग्रामसेविकेने कोडग यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, राजेश कोडग ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यावेळी त्यांनी महिला ग्रामसेविकेला “खुर्चीवरून उठ, नाहीतर तुझी बदली करेन”, त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ देखील करत त्यांना दमदाटी केली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. असभ्य वर्तन करून विनयभंग देखील केला, अशी तक्रार महिला ग्रामसेविकेने दाखल केली आहे. त्यानुसार राजेश कोडग यांच्या विरोधात दमदाटी, शासकीय कामात अडथळा आणणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आणि विनयभंग, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती जत तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बापाला दारूचं व्यसन, मद्यपी बापाला पोटच्या गोळ्यांनी कायमचं संपवलं; घटनेनं औरंगाबाद हादरलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here