आधार कार्डनुसार केशव भिकाजी काशीद (वय २९ वर्ष, बार्शी नाका, बीड) अशी तरुणाची ओळख पटली आहे. त्याच्या पॅंटच्या खिशात एक घड्याळ, एक पाकिट, त्यात आधार कार्ड आणि ७५ रुपये अशा गोष्टी आढळून आल्या आहेत. मात्र या तरुणाने नेमकी आत्महत्या केली, त्याच्यासोबत घातपात झाला, की तो बेपत्ता आहे, हे मात्र समजू शकले नाही.
आधार कार्ड सापडलेला केशव काशीद हा मूळचा नेकनुरचा रहिवासी आहे. तो बीडमध्ये त्याच्या मामाच्या घरी राहतो. तो गॅरेजवर काम करतो. त्याचे मामा आणि घरचे बाहेरगावी गेले असता तोही त्याच दिवसापासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र बिंदुसऱ्याच्या काठावर त्याचे कपडे, पाकीट आणि घड्याळ सापडल्याने हा प्रकार नेमका काय यावर लक्ष केंद्रित करून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.
बरेचदा आधी मृतदेह सापडतो, आणि नंतर एखाद्या व्यक्तीचा शोध सुरू होतो, मात्र या ठिकाणी त्या व्यक्तीची पूर्ण ओळख पटणारे साहित्य सापडले आहे, परंतु ती व्यक्ती गायब आहे. त्यामुळे आता हा तपास कशा पद्धतीने पोलीस प्रशासन करणार हे देखील पाहणे गरजेचे आहे.
ज्यावेळेस या तरुणाचे कपडे आणि आधार कार्ड सापडले, तेव्हाच पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यांनी हे आपल्याच भावाचे असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलीस प्रशासनाने अग्निशामन दलाला पाचारण केले. त्या धरणात खोलवर जाऊन त्याचा तपास केला, मात्र अद्यापही तरुणाचा शोध लागला नाही. आता पुढील तपास ग्रामीण पोलीस करत असून तपासाअंती नेमकं काय प्रकरण पुढे येतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे