अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्था पसरली आहे. काँग्रेससह अन्य पक्षांतही आता याचे पुढे काय होणार? याबद्दल उत्सुकता आहे. तर दुसरीकडे मात्र कारवाईपेक्षा समजुतीतून प्रश्न सोडविण्याकडे काँग्रेसमधील काही मंडळींचा कल दिसतो. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि थोरात यांच्या मनोमिलन घडवून आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातीलच काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तांबे आणि थोरातांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या पदाधिकाऱ्यांनी आता थोरात यांच्यासह इतरही नेत्यांशी संवाद साधण्याची तयारी दर्शविली आहे.

काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. अहमदनगर काँग्रेसचे शिष्टमंडळ थोरात, प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भेट घेणार असून गरज पडल्यास केंद्रीय नेत्यांचीही भेट घेतली जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. काळे म्हणाले, सध्याच्या एकूण घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, डिझेल, पेट्रोल, गॅसचे सामान्य माणसाच्या अवाक्या बाहेर गेलेले दर यामुळे जनता हवालदिल आहे. राज्यातील शिक्षक, पदवीधर निवडणुकांचा निकाल हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी उत्साह वाढवणारा आहे. मात्र सध्याच्या पक्षांतर्गत राजकीय स्थितीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर थोरात यांची लवकरच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आम्ही भेट घेणार आहोत.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याशी देखील संवाद करणार आहोत. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १५ फेब्रुवारीला पक्षाच्या मुंबईतील टिळक भवन येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचे निमंत्रण जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना आले आहे. वेळप्रसंगी पाटील यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

किरण काळे यांच्याकडे सध्या शहर आणि जिल्ह्याच्याही अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. आमदार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्यावर कारवाईची तयारी पक्षाने केली. तेव्हा त्यांनी राजीनामा दिल्याने ग्रामीण जिल्ह्याची जबाबदारी काळे यांच्याकडे आहे.

स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले; विखे-पाटलांचा बाळासाहेब थोरातांना सणसणीत टोला
काळे मुळचे थोरात समर्थक आहेत. थोरात प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत काळे यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या भूमिकेशी ठाम राहून तांबे यांच्या विरोधात भमिका घेतली होती. आता निकालानंतर पुन्हा चित्र बदलत असून या दोन नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेण्याचे ठरविल्याचे दिसते.

भाजपकडून ऑफर, राष्ट्रवादीनेही खुणावलं; बाळासाहेब थोरातांच्या मनात नक्की चाललंय काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here