यावेळी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या आई, बहीण, मुलगा यांनी फोडलेला हंबरडा हा अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा असा होता. त्यांचा मुलगा म्हणाला की “मला बाबा नेहमी गाडी सावकाश चालव, आयटीआयला जा, असं नेहमी सांगत असत” या कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी अक्षरशः मन सुन्न करणारी होती.
शशिकांत वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करणारे लिखाण करत होते. त्यांची शेवटची बातमी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘महानगरी टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाली होती. आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो असल्याची ती बातमी होती. आणि त्याच दिवशी दुपारी त्यांच्यावर हल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
आता या सगळ्या प्रकरणात राज्यभरातील पत्रकारांनीही निषेध आंदोलन सुरू केले आहे. रिफायनरी विरोधात लिखाण केल्याचा राग मनात धरून संशयित आरोपी आणि रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी शशिकांत वारिशेंची हत्या केल्याचा आरोप आहे. शशिकांत यांच्या घरची परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे. त्यामुळे आता यावर शासन कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News