पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला नव्या घडामोडी सुरु आहेत. यापैकी कसब्यात काँग्रेस आणि भाजपला आपापल्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूत काढण्यात यश आले आहे. परंतु, चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्यापही चिंतेत आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीतील उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे राहुल कलाटे नाराज झाले होते. गेल्या निवडणुकीत चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या मतांची टक्केवारी लक्षणीय होती. त्यामुळे आताच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक विनवण्या करुनही राहुल कलाटे हे माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता मविआने उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राहुल कलाटे यांनी मनधरणी सुरु केल्याचे दिसत आहे.

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. राहुल कलाटे हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने कलाटे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. उद्या पोटनिवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या माध्यमातून राहुल कलाटे यांना खास संदेश पाठवल्याचे समजते. याविषयी माहिती देताना सचिन अहिर यांनी म्हटले की, राहुल कलाटे पूर्वी आमच्या पक्षाचे गटनेते राहिले होते. त्यामुळे त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु. राहुल कलाटे यांचं वय पाहता त्यांचं राजकीय भविष्य चांगलं आहे, त्यांना अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. शेवटी अपक्ष लढण्याला काही मर्यादा असतात. गेल्यावेळी त्यांना चांगली मतं पडली होती. पण त्यावेळी कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिपचा पाठिंबा होता, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बुधवारी रात्री मी स्वत: राहुल कलाटे यांना निरोप दिला आहे. आज उद्धव ठाकरे स्वत:ही राहुल कलाटे यांच्याशी फोनवरुन बोलू शकतात. राहुल कलाटे यांनी मविआला मदत करावी, हाच आमचा प्रयत्न राहील, असे सचिन अहिर यांनी म्हटले. त्यामुळे आता राहुल कलाटे हे उद्धव ठाकरेंचे ऐकून चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, हे पाहावे लागेल.

…तर कसबा आणि चिंचवड निवडणुका बरखास्त होतील, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचे मोठे विधान

चिंचवडमध्ये भाजपला सहानुभूतीचा फायदा होणार का?

पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या खास मर्जीतील नेते म्हणून ओळखले जाणारे नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपला सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान आहे. अशात राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. राहुल कलाटे यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत थोडीथोडकी नव्हे तर १ लाख १२ हजार मतं मिळवली होती. या निवडणुकीतही राहुल कलाटे यांनी हाच परफॉर्मन्स कायम ठेवल्यास राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना जिंकणे जवळपास अशक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here