मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या ‘पठाण’ चित्रपटाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मात्र कौतुक केले आहे. राज ठाकरेंनी अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना पुष्पगुच्छ पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. यासोबतच राज ठाकरेंनी दोघांना खास मेसेजही लिहिल्याची चर्चा आहे.

मनसेने याआधी ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध केला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याबद्दल राज ठाकरेंनी आता त्यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांना बुके पाठवल्याचं वृत्त ‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीने दिलं आहे.

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना राज ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशही पाठवला आहे. यापूर्वी पठाणच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी पुन्हा यूटर्न घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अमेय खोपकरांचा इशारा

‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाळवी, बांबू यासारख्या मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधाची भूमिका घेतली होती. ‘पठाण’चं भलं करा, मात्र मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायला पाहिजे, नाहीतर आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं.

शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना तब्बल चार वर्ष वाट बघावी लागली होती. शाहरुख खानच्या पुनरागमनाची चाहत्यांना उत्सुकता होती. दोन आठवड्यात या चित्रपटाने साडेचारशे कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.

रईस चित्रपटावेळीही वाद

यापूर्वीही शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाला मनसेने विरोध केला होता. या सिनेमातील माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीला त्यांचा विरोध होता. त्यानंतर शाहरुख खाने राज ठाकरेंचे तत्कालीन निवासस्थान कृष्णकुंजवर जाऊन ‘रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत भेट घेतली होती. माहिरा चित्रपटाच्या प्रमोशनला भारतात येणार नाही, अशी हमी दिल्यानंतर मनसेच्या विरोधाचं अस्त्र म्यान करण्यात आलं होतं.

ओंकार ज्या पद्धतीने तुझ्याकडे पाहतोय… फोटोवर आस्ताद काळेची कमेंट, प्रियदर्शिनी म्हणते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here