यावर्षी सरकारने तुरीला ६३००रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव जाहीर केला होता. हंगामाच्या सुरवतीलाच तुरीला चांगले दर मिळत आहेत. मध्यंतरी तुरीच्या दरात घट झाली होती. मात्र, आता वाढत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तुरीचे यंदा उत्पन्न घेतले आहे. सरासरी एकरी चार ते पाच क्विंटल एव्हढेच उत्पादन झाले. मात्र, भाव चांगले मिळत असल्याने कसर भरून निघत आहे. आज आम्ही १० क्विंटल तूर विक्रीसाठी आणली होती. ७५४८ रुपये दर मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे दर समाधानकारक आहेत, असं आज बाजारात तूर विक्रीसाठी आणलेले शेतकरी सदानंद काळे यांनी सांगितलं.
तुरीची आवक वाढल्या संदर्भात बोलताना रिसोडचे अडते रवी जाधव यांनी सांगितले की दर चांगले मिळत असल्याने सध्या आवक चांगली आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, ही दरवाढ फार मोठी असेल की नाही हे सांगता येत नाही, असंही ते म्हणाले.
सोयाबीनचे दर स्थिरावले
वाशिम जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यात सोयाबीनचं सर्वाधिक उत्पन्न वाशिममध्ये घेतलं जातं. सोयाबीनचे दर दोन दिवसांपासून वाढले होते. मात्र, सोयाबीनचे आजचे दर स्थिरावले असल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाशिममध्ये काल सोयाबीनला ४९१० ते ५२२५ रुपये दर मिळाला होता. आज सोयाबीनचा दर ५००० ते ५२२५ रुपये मिळाला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक देखील वाढली आहे. आज २७५० क्विंटलची आवक झाली.