सातारा : साताऱ्याजवळील बोरखळ येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुष्कर पवार (रा. गणेशवाडी, ता. जि. सातारा, वय २१ वर्ष) असं या तरुणाचे नाव आहे. दोन बैलगाड्यांची धडक होऊन अपघात झाल्यानंतर बैल अंगावर पडल्याने गुदमरून पुष्करचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येते आहे.

बोरखळ येथे आज भैरवनाथ नवतरुण मंडळांनी जरंडेश्वर केसरी नावाने बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. दुपारी तीन वाजताच्या सुमारास बैलगाडी स्पर्धेला प्रारंभ झाला. झेंडा दाखवताच वाऱ्याच्या वेगात बैलगाड्या पळत होत्या. २१ वर्षीय पुष्कर हा बैलगाडी हाकत होता. त्यावेळी त्याच्या मागील बैलगाडीचा बैल सुटून अंगावर येऊन पडल्याने त्याचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. यात त्याच्या हृदयाला आणि छातीलाही जोरात मार लागला होता.

पुष्कर पवार हा गणेशवाडी येथील रहिवासी आहे. त्याला गेली तीन-चार वर्षापासून बैलगाडी शर्यत हाकण्याचा नाद होता. तो विविध छोट्या-मोठ्या बैलगाडी शर्यतींमध्ये बैलगाडी हाकत होता. लहानपणापासूनच त्यालाही आवड असल्याने बैलगाडी स्पर्धेमध्ये त्याचा अनेक वेळा सत्कारही करण्यात आला होता, असे एका जॉकीने सांगितले.

आज घरून निघताना पुष्कर खुश होता. आई-वडील मित्र यांच्याशी तो आज दिलखुलास बोलला होते, त्याचे आजचे वागणे काही वेगळे सांगून गेले, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. शर्यतीला येण्याअगोदर तो खेळकरपणे वागत होता. पण नियतीने काहीतरी वेगळेच मांडून ठेवले होते. दिवसभर खुश असलेल्या पुष्करवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे घटनास्थळी हाहाकार माजला. ही स्पर्धा लगेच बंद करण्यात आली.

घटनास्थळी आयोजकांनी वैद्यकीय सुविधेची सोय केली नसल्याची बैलगाडी प्रेमींमध्ये चर्चा होती. रुग्णवाहिकेची सोय असती तर गुदमरलेल्या पुष्करला प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असते. मात्र, ही सोय नसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तेथील खाजगी गाडीने त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

सासू, सासरे, नवरा, दुसऱ्या नवऱ्याची बायको; १४ वर्षांत ६ जणांना संपवलं, बाळालाही सोडलं नाही
ऐन तारुण्यात एकुलता एक असलेल्या पुष्करच्या मृत्यूची बातमी कळतातच आई-वडिलांसह नातेवाईक, मित्रांनीही टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळतात त्यांनी तडक सातारा जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्र, गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

उजनी जलाशयात मच्छिमाराला बॅग सापडली, उघडून बघताच थरकाप, हातावरचा टॅटू ठरणार महत्त्वाचा
या घटनेची नोंद तालुका पोलीस स्टेशनला रात्री उशिरा आली. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बैलगाडी शर्यतीची आयोजकांनी पोलीस ठाण्यातून रितसर कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आईचा टाहो, मुलाचा आक्रोश… पत्रकार शशिकांत वारीसेंचा अपघात नसून घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here