रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ करत रेपो दर ६.५० टक्के झाला आहे. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महाग होते. परिणामी बँका कर्जाचे आणि गुंतवणूकीचे व्याजदर वाढवतात. यामुळे बाजारातील रोकड बँकेत जमा होते.
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ बडोदाने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजेच बेस रेट ९.१५ टक्के केला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कर्ज दर ८.८५ टक्के होता. त्याचवेळी सर्व विद्यमान खात्यांवर बँकेचा वार्षिक कर्ज दर (BPLR) १३.४५ टक्के आहे, जो १२ जानेवारी २०२३ पासून लागू होईल.
बँक ऑफ बडोदा मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) एका रात्रीच्या कालावधीसाठी ७.८५ टक्के आहे. तर एका महिन्यासाठी MCLR ७.९५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 8.05 टक्क्यांवरून ८.२५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR ८.१५ टक्क्यांवरून ८.३५ टक्के, तर एका वर्षासाठी MCLR ८.३० वरून ८.५ टक्क्यांवर वाढवला आहे.
बँकेने MCLR मध्ये कोणताही बदल केल्यास कर्जाच्या व्याजदरावर तात्काळ परिणाम होईल. कर्जावरील व्याजदर वाढल्यास ईएमआय आपोआप वाढेल. यामुळे कर्जदाराला MCLR शी जोडलेल्या कर्जावर वाढीव ईएमआय रक्कम भरावी लागेल.