नवी दिल्ली: शत्रूच्या काळजात धडकी भरवणाऱ्या घातक फायटर जेटचे थोड्याच वेळात हरयाणातील अंबाला हवाईतळावर आगमन झाले आहे. ही विमाने अंबाला हवाईदलाच्या तळावर उतरल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राफेल विमानांमुळे आता भारतीय संरक्षण क्षेत्राच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारतीय हवाईदलाची शक्ती वाढवणाऱ्या या विमानाचा नेत्रदीपक व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आकाशाच्या अमर्याद उंचीशी स्पर्धा करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उड्डाण करणाऱ्या या ५ राफेल फायटर जेटचा हा व्हिडिओ पाहताना कोणाचाही ऊर अभिमानाने फुलून येईल. मात्र या व्हिडिओत ५ राफेल फायटर विमानासह आणखी दोन विमाने देखील दिसत आहेत. ही विमाने SU30 MKIs आहेत. या मुळे व्हिडिओत एकूण ७ विमाने उड्डाण करताना दिसत आहेत.

भारताच्या अंबाला हवाईदलाच्या तळावर ही शक्तीशाली राफेल लढाऊ विमाने तैनात करण्यात येत आहेत. अंबाला हा भारतीय हवाई दलाचा अत्यंत मोक्याचा हवाई तळ असून या तळावरून शत्रूला नेस्तनाबूत करण्यात भारताला अत्यंत सोईचे असल्याचे मानले जाते.

पाहा-

भारताच्या भूमीवर उतरली राफेल

फ्रान्सकडून झेपावलेली राफेल ही घातक लढाऊ विमाने आज भारतीय भूमीवर उतरली आहेत. भारतीय हवाई दलाचा दरारा आशियात यापूर्वीच आहे. आता राफेल भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर हवाईदलाची ताकद अनेक पटींनी वाढलेली आहे. हे विमान जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील दुर्गम डोंगराळ भागात भारताला सर्व प्रकारच्या हवामानात सेवा देणार आहे.

चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर या घातक राफेल विमानांची तैनाती केल्याने भारताचे हवाई संरक्षण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे, यात शंका नाही. भारतीय राफेलच्या समोर चीनचे चेंगदू जे -२० आणि पाकिस्तानचे जेएफ -१७ ही लढाऊ विमाने आहेत. मात्र, ही दोन्ही प्रकारची विमाने राफेलपेक्षा शक्तीने थोडेसे कमीच दिसत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

12 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here