कसबा बिनविरोध होण्याची शक्यता संपली
पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलं होतं. मात्र, आता कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपली आहे. निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत संपली आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर भाजप-शिंदे गट युती कडून हेमंत रासने रिंगणात आहेत.
अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे निवडणुकीच्या रिंगणात
बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी मात्र त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाहीत. अभिजीत बिचुकले यांनी यापूर्वी साताऱ्यातून निवडणूक लढवली होती. तर, पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत देखील त्यांनी अर्ज दाखल केला होता. “भकास झालेल्या कसब्याचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवतोय”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले होते. तर, कसबा पेठ मतदारसंघातून भाजपनं ब्राह्मण उमेदवाराला डावलल्याचा दावा करत आनंद दवे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.
कसब्यात आता हेमंत रासने रवींद्र धंगेकर आमने सामने
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतून आज संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पार्टीनं माघार घेतली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडनं उमेदवारी अर्ज मागं घेतला. संभाजी ब्रिगेडच्या अविनाश मोहिते यांनी कसबा तर प्रवीण कदम यांनी चिंचवड मतदारसंघातून माघार घेतली. यामुळं आता कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे.