वडिलांचे काका ‘अया’चे संगोपन करणार
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर ‘अया’ला मी घरी घेऊन जाईन. कारण तिच्या कुटुंबातील सर्वांचा भूकंपात मृत्यू झाला आहे, असं सलाह अल बद्रान म्हणाले. भूकंपात बद्रान यांचंही घर उद्ध्वस्त झालं आहे. सध्या ते कुटुंबासह एका तंबूत राहत आहेत. ‘अया’ला वाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती एका चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून धुळीने माखलेल्या एका बाळाला घेऊन पळत येताना व्हिडिओत दिसतोय. दुसरा एक व्यक्ती कडाक्याच्या थंडीत नवजात बाळासाठी चादर घेऊन पळत येताना दिसतोय. तर बाकीचे बाळाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी घाई करताना दिसत आहेत.
डॉक्टरची पत्नी चिमुकलीला पाजतेय दूध
हा व्हि़डिओ बघून हजारो नागरिकांनी अनाथ झालेल्या चिमुकलीला दत्तक घेण्याची ऑफर दिली होती. मुलीला उपचारासाठी आफरीन वस्तीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिच्या शरीरावर जखमा आहे. कडाक्याच्या थंडीत ती मोठ्या प्रयत्नांनी श्वास घेत होती. आता एका डॉक्टरची पत्नी आपल्या बाळासह चिमुकलीलाही दूध पाजत आहे. ‘कडाक्याच्या थंडीमुळे तिला हायपोथर्मिया झाला आहे. आम्ही तिला ऊब देत आहोत आणि कॅल्शियम दिल जात आहे’, असं एका डॉक्टरने सांगितलं.
युनिसेफकडूनही मदतीचे काम सुरू
सोमवारी आलेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपाने तुर्कीसह सिरिया हादरलं. या भूकंपात अनाथ झालेल्या अनेक मुलांपैकी ‘अया’ एक आहे. मुलांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या संस्थेकडून भूकंपग्रस्त अनाथ मुलांसाठी मदत करण्यात येत आहे. ज्या मुलांच्या आई-वडिलांचा भूकंपात मृत्यू झाला आणि बेपत्ता झाले, आणि हॉस्पिटलमध्ये समन्वय साधून त्यांच्या कुटुंबातील अशा सदस्यांचा शोध घेतला जात आहे, जे त्यांची देखभाल करण्यात सक्षम असतील, असं युनिसेफकडून सांगण्यात आलं आहे.