मुंबई : एसी डबल डेकर ई-बसमधून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. पुढच्या आठवड्यापासूनच या बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गावर सुरुवातीला ही बस धावेल.

पहिली एसी डबल डेकर ई बस काही दिवसात मुंबईत दाखल होणार असून पुढील आठवड्यात ती सेवेत रुजू होईल. सुरुवातीला केवळ पाच बसेस प्रायोगिक तत्त्वावर मुंबईच्या रस्त्यांवर धावतील. मार्च अखेरपर्यंत मुंबईतील विविध रस्त्यांवर तब्बल २०० एसी डबल डेकर ई बस रुजू करण्याची योजना असल्याचं ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितल्याचं वृत्त ‘मिड-डे’ वृत्तपत्राच्या वेबसाईटने दिले आहे.

एका एसी डबल डेकर ई बसमध्ये सामान्य डबल डेकर प्रमाणेच ७८ जण प्रवास करु शकतात. या बसला सिंगल डेकरप्रमाणे पुढे आणि मागे असे दोन्ही बाजूंना दरवाजे असतील. सामान्यतः सध्याच्या डबल डेकर बसेसना केवळ मागील बाजूला एकच दरवाजा आहे.

पहिली बस कुर्ला-सांताक्रुज या मार्गावर धावेल. तर पिक अवरमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गावर इतर एसी डबल डेकर ई बस धावतील. कुलाबा डेपो, मजास डेपो, कुर्ला डेपोतून या बस निघतील. ज्या मार्गांवर सध्या साध्या डबल डेकर बसेस धावतात, त्याच मार्गांवर या एसी ईबसही धावतील.

जास्तीत जास्त मार्गांवर बसेस चालविण्यासाठी एसी डबल-डेकर ई-बस कार्यान्वित करण्यापूर्वी बेस्ट बस डेपोमध्ये चार्जिंग पॉइंट्स सुरु करण्याची प्रक्रिया चालू आहे. सर्व ई बसेस येईपर्यंत कुलाबा, मजास आणि कुर्ला डेपोत चार्जिंग स्टेशन्स तयार ठेवली जाणार आहेत.

मुंबई-ठाणे पाण्याखालून प्रवास, देशातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्रात, मुहूर्त ठरला
२०२३-२४ या आर्थिक वर्षात, बेस्टकडून मुंबई शहरात सुमारे ४००० ई-बस सुरू करण्याचा विचार करत आहे. सध्या पाच बस डेपोंमध्ये ई-चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जात आहे, लवकरच मुंबईतील २७ बस डेपोंमध्ये ई-चार्जिंगची पायाभूत सुविधा तयार होईल. विशेष म्हणजे गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ई-बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते.

कठडे तोडून दोन चाकं हवेत, उसाने खच्चून भरलेल्या ट्रॅक्टरचा थरकाप उडवणारा अपघात
सध्या, बेस्टच्या ताफ्यात मुंबईत ४१० ई-बस कार्यरत आहेत. ज्यात बेस्टच्या प्रीमियम बसचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात बीएमसीने आपल्या बजेटमध्ये संपूर्ण शहरात ३ हजार नवीन ई-बस सुरू करण्याचा उल्लेख केला आहे.

कवडीमोल बाजार भावामुळे शेतकऱ्याने कोबी पिकावर फिरवला रोटावेटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here