पुणे : जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे एका दाम्पत्याने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. भालचंद्र ऊर्फ विकास पोपट जगताप (वय ४२) आणि जयश्री भालचंद्र ऊर्फ विकास जगताप (वय ३५) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. सदर दाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नसून याप्रकरणी यवत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

शून्यातून विश्व निर्माण करून आपला संसार जगताप दाम्पत्याने उभा केला होता. मात्र त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील भीमा नदीपात्रात सात जणांचे हत्याकांड झाल्याचं उघड झालं होतं. आता या दाम्पत्याने आपले जीवन संपवल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सुखी संसाराला कुणाची नजर लागली, अशा भावना जवळच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

कुटुंबात २१ वर्षांनी पाळणा हलणार होता, पण एका घटनेने आनंदावर पडलं विरजण, गर्भवती महिला…

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास जगताप यांचा पारगावमध्ये गाड्या वॉशिंगचा व्यवसाय होता. तसंच ते जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय देखील करत होते. त्यांची पत्नी जयश्री यांचे गावात ब्युटी पार्लरचे शॉप होते. दोघांनी कष्टातून आपला संसार उभा केला होता. विकास आणि जयश्री यांचा प्रेमविवाह झाला होता. जयश्री ही विकास यांच्या मामाची मुलगी असल्याने तिला घरातील सर्व माहीत होते. आर्थिक दृष्ट्यादेखील हे जगताप कुटुंब समृद्ध होते. दोघांनी आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला होता. मात्र गुरुवारी रात्री जेवण करून दोघे झोपले, सकाळी मुलाने त्यांना उठवण्याठी आवाज दिला. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या घराचा दरवाजा तोडला. आईने एका खोलीत आणि वडिलांनी दुसऱ्या खोलीत गळफास घेतल्याचे आढळून आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या या दाम्पत्याने असं टोकाचं पाऊल का उचललं, याची चर्चा आता सुरू झाली आहे. यवत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here