केवळ रत्नागिरीचीच नव्हे तर कोकणच नाव सांस्कृतिक विश्वात भारतभरात पोहोचवणारा ‘आर्ट सर्कल’ आयोजित ‘थिबा राजवाडा ‘ दि. २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी साकारत आहे. शास्त्रीय संगीताची स्वर्गीय अनुभूती आणि राजवाड्याची भव्यता हा संगम निव्वळ शास्त्रीय संगीत प्रेमींनाच नव्हे तर आबालवृद्धांना मोहात पाडतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी या महोत्सवाला हजेरी लावल्यामुळे हा स्वरमंच शब्दशः कीर्तिवंत झाला आहे. यंदाही या महोत्सवाला प्रतिभावान कलाकार लाभले आहेत. विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर या जगप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने यंदाचा महोत्सव सजाणारच आहे पण नवोदितांच्या उपस्थितीनेही रंगणार आहे.

दि. २४ रोजी महोत्सवाचे उदघाटन होईल डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम नृत्य कीर्तनाने!

मंदिरामध्ये ईशसेवा करण्यासाठी म्हणून निर्माण झालेली भरतनाट्यम ही नृत्यशैली अस्सल भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे. डॉ. कनिनिका आणि पूजा ह्या कलाकारद्वय कीर्तन, नृत्य, संगीत यांचा अनोखा मेळ साधत नृत्यकीर्तन सादर करणार आहेत. या नृत्यकीर्तन मध्ये सरस्वती सुब्रमण्यम गायन साथ, अतुल शर्मा बासरी साथ, आणि सतीश कृष्णमूर्ती मृदुंग साथ करून सादरीकरण परिपूर्ण करण्यास सहकार्य करतील. नृत्यकीर्तन नंतर लगेचच विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. विदुषी श्रुती सडोलीकर काटकर हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक अत्यंत आदरणीय नाव! पंडित वामनराव सडोलीकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर मंगेश मुळ्ये तबला साथ करणार आहेत. जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू असलेल्या विदुषी श्रुती सडोलीकर महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप करणार आहेत. ही कै. शंकरराव टेंगशे स्मृती मैफल आसमंत बेनेव्होलेन्स यांच्या सहयोगाने होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे दि. २५ रोजीचा प्रारंभ महाराष्ट्रातील आश्वासक युवा गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या गायनाने होणार आहे. लिटिल चॅम्प्स च्या मंचावरून घराघरात पोहोचलेली मुग्धा आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नवीन पिढीतील आश्वासक कलाकार आहे. सुप्रसिद्ध वादक अनंत जोशी मुग्धाला संवादिनी संगत तर स्वप्नील भिसे तबला संगत करणार आहेत. त्या नंतर लगेचच संतूर वादक संदीप चॅटर्जी, बासरी वादक संतोष संत, तबला वादक पं. रामदास पळसुले आणि पखवाज वादक पं. भवानीशांकर यांची जुगलबंदी रंगणार आहे. प्रसिद्ध फुटबॉल पटू अशोक कुमार चॅटर्जी यांच्या कलाकार सुपुत्राने अर्थात संदीप यांनी वयाच्या ८ व्या वर्षांपासून संतूर शिकायला सुरुवात केली. गुरू पं. तरुण भट्टाचार्य यांच्याकडे गेली ३५ वर्षाहुन अधिक काळ शिक्षण घेत आहेत तसंच, पं. अजय चक्रवर्ती यांच्याकडे रागदारी आणि लयकारीचे शिक्षण घेत आहेत.

बासरीवादक संतोष संत हे पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत. घरातूनच मिळालेले संगीताचे संस्कार वृद्धिंगत करत संत यांचा सांगीतिक प्रवास चालू आहे. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य रामदास पळसुले मैफिलीला तबला साथ करणार आहेत. गेली २ दशकं भारत भरातील शिष्याना पारंपरिक गुरुकुल पद्धतीमध्ये प्रशिक्षण देत आहेत. या मैफिलीमध्ये ज्येष्ठ पखवाज वादक पं. भवानी शंकर साथ करणार आहेत. वयाच्या ८ व्या वर्षापासून पखवाज आणि तबला यांचं शिक्षण पं. भवानी शंकर यांनी सुरु केलं. शास्त्रीय संगीत आणि फ्युजन बँड अशा दोन्ही संगीत पद्धतीमध्ये साथ संगत करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी अर्थात दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुरुवातीला असलेले विशेष आकर्षण म्हणजे स्त्री ताल तरंग -लय राग समर्पण! घटम सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटम वादक सुकन्या रामगोपाल यांनी जबरदस्त प्रभुत्व प्राप्त केलं आहे. भारतातील त्या पहिल्या स्त्री घटमवादक आहेत. वेगवेगळ्या श्रुतीचे ६ ते ७ घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा घटतरंग हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. सर्व वादक स्त्री कलाकार आहेत. व्हायोलिन सौम्या रामचंद्रन, मृदुंग लक्ष्मी पिल्लई, वीणा वाय. जी. श्रीलता, तर मोर्चीग भाग्यलक्ष्मी असा वाद्यमेळ आणि कलाकार आहेत.

महोत्सवाचा समारोप करणार आहेत ज्येष्ठ कलाकार पं. उल्हास कशाळकर. वडील नागेश कशाळकर यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पं. कशाळकर यांनी पं. गजाननबुवा जोशी, पं. राम मराठे, पं. राजाभाऊ कोकजे, पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडून गायन शिकत त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीनही घराण्याची गायकी आत्मसात केली. कोलकाता संगीत रिसर्च अकॅडमी च्या माध्यमातून गेल्या 25 वर्षात अनेक शिष्य त्यांनी घडवले आहेत. जगभरातले उत्तमोत्तम मानसन्मान पं. कशाळकर यांना लाभले असून यंदा थिबा राजवाडा संगीत महोत्सवाचा रंगमंच ते आपल्या उपस्थितीने सन्मानित करणार आहेत.

प्रतिभावान कलाकारांच्या सादरीकरणाने यंदाचाही महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे अविस्मरणीय व्हावा यासाठी आर्ट सर्कल प्रयत्नशील आहे. रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि महोत्सवाचा आनन्द घ्यावा असे आवाहन आर्ट सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here